राज्यात ३५ ठिकाणी आणि देशात १७ ठिकाणी क्लबच्या माध्यमातून सिनेमा पोहोचवणार
मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळे विषय हाताळले जात असल्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची मोहर त्यावर उमटविली. मात्र काही वेळा प्रसिद्धी आणि चित्रपटातील कलावंतांची जंत्री पाहता प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत जातो, पण त्यांचा भ्रमनिरास होतो. प्रेक्षकांची अशी फसवणूक टाळण्यासाठी मित्र फिल्म क्लबने पुढाकार घेतला आहे. राज्यात ३५ ठिकाणी आणि राज्याबाहेर १७ ठिकाणी क्लबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार मराठी चित्रपट पोहचावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नाशिकपासून या उपक्रमाची सुरुवात होत आहे.
मित्र फिल्म क्लब संस्था मराठी प्रेक्षक आणि दर्जेदार मराठी चित्रपट निर्माते यांच्यात दुवा म्हणून काम करणार असल्याची माहिती समन्वयक आशीष कुलकर्णी यांनी दिली. यासाठी चित्रपट क्षेत्रातील पडद्यावरील, पडद्यामागील जाणकार दिग्दर्शक, समीक्षक, कलावंत, तंत्रज्ञ आदींची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती नव्याने येणाऱ्या मराठी चित्रपटांचे समीक्षण करत दर्जेदार मराठी चित्रपट रसिकांपर्यंत पोहचवणार आहे. वर्षांतून असे सहा चित्रपट रसिकांना पाहता येतील. यासाठी मल्टीप्लेक्सच्या संघटनांशी बोलणी झाली असून ‘प्राईम टाईम’मध्ये हे चित्रपट प्रदर्शनापासून पुढील दोन-तीन आठवडे पाहता येतील अशी व्यवस्था करण्यात येईल. तसेच, क्लबचे सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे चित्रपट ‘मल्टीप्लेक्स’मध्ये सवलतीच्या दरात पाहता येणार आहेत. यासाठी क्लबने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले असून या माध्यमातून सभासद तसेच प्रेक्षकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संकेतस्थळावर प्रेक्षकांनी भेट दिल्यास त्यांचे घरबसल्या मनोरंजन होईल यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. नव्याने येणारे मराठी चित्रपट, त्यांचे प्रोमो, जाहिराती, विविध विषयावरील लघुपट, माहितीपट, चित्रपटातील गाणी यासह काही महोत्सवांची झलक, चित्रपटांचे समीक्षण आदी यातून पाहता येईल. जे लघुपट किंवा माहितीपट प्रेक्षकांपर्यंत पोहचले नाहीत ते दर्दी रसिकांपर्यंत पोहचवण्यात येतील तसेच अशा निर्मात्यांना आर्थिक स्रोतही उपलब्ध करून दिला जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्लबच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून सभासदत्व मिळवता येते. राज्यात नाशिक, मुंबई, पुणे यासह ३५-४० ठिकाणी क्लबचे काम सुरू असून राज्याबाहेर १७-१८ ठिकाणी क्लबमार्फत मराठी चित्रपट दाखविले जाणार आहेत. यासाठी विभागीय पातळीवर समन्वयकांची नेमणूक करण्यात आली असून नाशिक विभागासाठी पीयूष कुलकर्णी (९४२२७ ६६०५९) व विनोद कदम (८०५५२ ४२३२४) यांच्याशी रसिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitra film club create to strengthen marathi films