आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना ‘मित्र’ चे ‘नवजीवन’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची वाताहात होऊ नये यासाठी भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या (बायफ) प्रेरणेने स्थापन झालेल्या ‘मित्र’ (महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज) या संस्थेने ‘नवजीवन’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पास जूनपासून सुरूवात होणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त विनायकदादा पाटील यांनी पिंपळगाव बसवंत येथे आयोजित कार्यक्रमात दिली.

शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या मित्र संस्थेचे कृषी अधिकारी नवजीवन प्रकल्पातंर्गत लाभार्थी कुटुंबाशी सतत संपर्क ठेवून त्यांना माती परीक्षण, उत्पादन खर्च कमी करणे, पिकांच्या वाणाची निवड, नवीन पिकांची लागवड, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर याविषयी मार्गदर्शन करतील. नाशिक जिल्ह्य़ात आत्महत्याग्रस्त कुटुंबांची संख्या ८३ आहे. प्रकल्पात ‘नवीन पिकांची लागवड’ अंतर्गत एका आत्महत्याग्रस्त कुटुंबास एक एकर शाश्वत फळबाग करून देण्यात येणार आहे. त्यात खड्डे खोदणे, रोपे पुरविणे, खते, औषधे व स्वतंत्र ठिबक यंत्रणा तसेच बागेच्या उत्कृष्ट व्यवस्थापना विषयी सतत मार्गदर्शन मित्र संस्थेचे तज्ज्ञ करणार आहेत. यासाठी प्रति कुटुंब अंदाजे एक लाख रूपयांचा खर्च येणार आहे. संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या मदतीचा कालावधी दोन वष्रे आहे. आजपर्यंत काही आत्महत्याग्रस्त कुटुंबांची संस्थेच्या कृषी अधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना नवजीवन प्रकल्पाची माहिती दिली आहे. निफाड तालुक्यातील दोन, चांदवड तालुक्यातील चार आणि बागलाण, देवळा तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे आठ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी या योजनेत सहभागी होण्यास संमती दिली आहे. इतरही कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या संमंतीनुसार त्यांचा सहभाग व पीक पद्धती ठरविण्यात येणार आहे.

निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथील आपत्तीग्रस्त कुटुंब प्रमुख ताराबाई बबन पडोळ यांची अडीच एकर द्राक्षबाग असून निधीअभावी त्या बागेतील मांडवाची उभारणी अर्धवट राहिली. परिणामी कमी उत्पन्न येऊन कुटुंब आíथक अडचणीत आले. या महिलेच्या विनंतीवरून लोखंडी पट्टय़ा, तारा यांची पूर्तता करून मांडव पूर्ण करण्यात आला. त्यास ६७ हजार रूपयांचा खर्च आला. संस्थेने केलेल्या मदतीच्या आवाहनामुळे ‘ओनियन र्मचट असोसिएशन िपपळगाव’ या संस्थेने तीन लाख रुपये देणगी देत तीन कुटुंबे दत्तक घेतली. या योजनेसाठी ‘मित्र नाशिक’ या नावाने धनादेश देण्याचे आवाहन संस्थेचे विश्वस्त विनायकदादा पाटील, मुख्य कार्यक्रम समन्वयक व्ही. बी. दायमा यांनी केले आहे. यावेळी मित्र संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे, कार्यक्रम अधिकारी राहुल जाधव, आश्लेषा देव  उपस्थित होते.

 

 

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitra organization help to suicides farmers family