लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: तापमानात चढ-उतार होत असले तरी उष्णतेची लाट कायम आहे. नाशिक शहरात पारा ३७.५ तर मनमाडमध्ये ३९ अंशांची नोंद झाली. प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना सटाणा तालुक्यातील नामपूर भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या वर्षी उन्हाळ्याच्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने मार्च व एप्रिलमध्ये उन्हाळ्याची तीव्रता फारशी जाणवली नव्हती. नैसर्गिक संकटाने हजारो हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होते. दरवर्षी एप्रिलपासून टळटळीत उन्हाचे चटके बसतात. तापमानाची पातळी तेव्हाच ४० अंशावर जाते. यंदा काहिशी उशिरा म्हणजे मे महिन्यात ही पातळी गाठली गेली. १० मे रोजी ४०.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. तेव्हापासून मागील १० ते १२ दिवसांत तापमानात चढ-उतार होत आहे. उच्चांकी पातळीपासून तापमान काहिसे कमी झाले असले तरी उन्हाचा तडाखा कायम आहे. नऊ- दहा वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवते. दुपारच्या उन्हाच्या झळांनी डोकेदुखी, चक्कर असाही त्रास होतो. दिवस-रात्र कमालीचा उकाडा जाणवत आहे.
हेही वाचा… धुळे: शिरपूर बाजार समितीच्या सभापतीपदी के. डी. पाटील
मनमाड शहरातील तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसांपासून ३९ अंशांवर स्थिरावला. उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. चालू महिन्यात ऊन चांगलेच तापले असून सध्या पारा एक अंशाने कमी झाला असूनही उन्हाच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून, घामाच्या धारांमध्ये मनमाडकर भिजून निघत आहेत. इतर भागात वेगळी स्थिती नाही. उकाड्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिक जागरण करतात.
हेही वाचा… धुळे: पणन केंद्रासाठी भारत राष्ट्र समितीचे घंटानाद आंदोलन
सुट्टी असून देखील उन्हामुळे नागरिक घरातच बसणे पसंत करतात. त्यामुळे प्रमुख भाग व उपनगरांमधील रस्त्यांवर सामसूम पाहायला मिळाली. उष्णतेपासून बचावासाठी वातानुकुलीत यंत्रणा, पंख्यांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागालाही उन्हाचे चटके बसत आहेत. तीव्र उकाड्यामुळे शेतीची कामे खोळंबत असून दैनंदिन जनजीवनावरही परिणाम होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात ही स्थिती असताना सटाणा तालुक्यातील नामपूर व परिसरात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास १० मिनिटे पाऊस झाला. पावसानंतर उकाड्यात अधिक वाढ होते. त्याची अनुभुती सध्या या भागात मिळत आहे.
उन्हाने वऱ्हाडींना घाम
मेच्या सुट्टयांचा काळ व त्यातच विवाह तिथींमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने हंगामातील २१ मे ही सर्वात मोठी लग्नतिथी होती. प्रत्येक गाव-खेड्यात विवाह सोहळा होता. वैशाख वनवा संपल्याने उन्हाचा तडाखा कमी होईल, हा अंदाज मात्र फोल ठरला. ज्येष्ठातही उन्हाचा तडाखा सुरूच आहे. त्यातच लग्नतिथीला हजेरी लावतांना उन्हाने वऱ्हाडींना घाम फोडला. वाढत्या तापमानामुळे ‘नको रे ते लग्न बाबा’ असे म्हणण्याची वेळ वऱ्हाडींवर आली होती. दुपारच्या विवाहांसाठी लग्न मंडप व मंगल कार्यालयात वाढत्या झळांपासून बचाव करण्यासाठी कूलर व पंखे लावावे लागत आहेत. विवाह सोहळ्यांना जाण्यासाठी अनेकांनी दुचाकीऐवजी चारचाकीला पसंती दिली.