निफाड तालुक्यातील गोदाकाठी जिल्हा प्रशासन व महावितरण कंपनीतर्फे खंडित केला गेलेला विद्युतपुरवठा पूर्ववत करावा, या मागणीसाठी आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. वीजपुरवठय़ाअभावी गोदा काठावरील गावांमध्ये टंचाईला तोंड द्यावे लागत असून, याबाबत लवकर निर्णय न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.
सध्या गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार २० तासांसाठी गोदाकाठच्या वीज पंपाचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे या भागात कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या वीज पंपांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिला असताना महावितरणच्या उपकेंद्रांनी संपूर्ण फिडरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच चार तास विद्युतपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले असताना तितका काळही अखंडित वीजपुरवठा केला जात नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याचे पाणी भरता येत नाही, अशी तक्रार आंदोलकांनी केली. संपूर्ण वीज बिले भरलेली असताना त्यांना पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी वर्गास अडचणींना तोंड द्यावे
लागत आहे. वीजपुरवठा खंडित केला असला तरी वीज बिल मात्र पूर्ण कालावधीचे दिले जाते. ही बाब अन्यायकारक आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई बेकायदेशीर असून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा दावा कदम यांनी केला. जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमुळे गावांवर टंचाईची स्थिती ओढावली आहे.
ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन आणि महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा