‘जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील आधीच्या संचालक मंडळात जी काही चुकीची कामे होती. त्याला आपण तत्काळ विरोध केला होता, असे सांगत निवडणुकीत आपल्याच पॅनलचा विजय होईल’, असा दावा आमदार चिमणराव पाटील यांनी केला. पारोळा येथे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटातर्फे आयोजित मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांचीही उपस्थिती होती.
हेही वाचा- नाशिकमध्येच ५० हजार मेट्रिक टन कांद्याची विक्री; दर पाडण्यास नाफेड जबाबदार असल्याचा आरोप
शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी दूध संघाच्या कामावर लक्ष ठेवून तत्कालीन दुग्धविकास मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या कामाचे कौतुक केल्याची आठवणही सांगितली. तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे कोणत्या पक्षाचे आहेत, हा विषय गौण आहे. मात्र, त्यांना कामाची आणि कार्यकर्त्यांची जाणीव होती. प्रत्येक कार्यकर्त्याला प्रोत्साहन द्यायचे, त्याचे एक उदाहण सांगत आमदार पाटील यांनी त्यावेळी दूध संघाला दूध पावडरमध्ये कमी नफा मिळायचा. मात्र, दुधामधून अधिक नफा मिळायचा. त्यामुळे दूध विकण्याकडे आमचा कल होता; परंतु दूध संकलन वाढल्यामुळे ते कुठे पुरवायचे, हा प्रश्न उभा राहिला. दूध संघाच्या जास्तीच्या या दुधाला राज्यात मागणी नव्हती. त्यामुळे संचालक मंडळासह अधिकार्यांसोबत चर्चा केली. चर्चेअंती आम्ही रेल्वे टँकरद्वारे कोलकात्ता येथे मदर डेअरीला दूध पाठविण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दूध संघासाठी फायदेशीर ठरला होता. दूध संघ चांगला नफ्यात तर आलाच. शिवाय रेल्वेद्वारे पहिल्यांदा इतर राज्यात अर्थात कोलकात्ता (पश्चिम बंगाल) येथे दूध पाठविणारा जळगाव दूध संघ हा देशात पहिला ठरला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याची दखल घेत त्यांच्या मंत्रिमंडळातील दुग्धविकासमंत्री मधुकर पिचड यांना निमंत्रण नसतानाही जिल्हा दूध संघाच्या नवीन टँकरच्या उद्घाटनासाठी पवार यांनी पाठविले होते. त्यावेळी स्वतः पिचड आले होते. त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दूध टँकर रवाना करण्यात आला होता. शरद पवार यांची दूरदृष्टी आपल्याला आवडली असल्याची आठवणही आमदार पाटील यांनी सांगितली.
हेही वाचा- नाशिक : अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी पोलिसांची मदतवाहिनी
चाळीसगावच्या पट्ट्यात कोरडवाहू शेती आहे. बागायतीची फारशी शेती नाही. त्यामुळे या भागात कोरडवाहू शेतकर्यांना जोडव्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. शेतीला दुग्ध हा चांगला जोडव्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय लक्ष दिल्यास शेतकर्यांचा आर्थिक स्तरही उंचावेल. त्याअनुषंगानेच दूध संघ आपल्याला सांभाळायचा आहे. गेल्या संचालक मंडळात जी काही चुकीची कामे झाली, त्याला आपण विरोध करीत चूक दाखविण्याचा प्रयत्न केला. आता प्रामाणिकपणे हा दूध संघ पुढे न्यायचा आहे. दूध संघात आपला विजय निश्चित आहे, असा दावाही आमदार पाटील यांनी केला. आमदार पाटील यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सुरुवातीपासून दूध संघाचे कधी अध्यक्ष, तर कधी संचालक राहिलो असल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण अतिशय कठीण परिस्थितीमध्ये दूध संघ असताना त्याचे दूध संकलन वाढवीत नेत दूध संघाचा विकास केला व त्याला मोठा केल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा- नाशिक : अंकाव्दारे भविष्य हे शास्त्र असल्याचे सिध्द करा – अंनिसचे ईशान्येश्वर संस्थानला आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असा आरोप शिंदे गटातील आमदारांकडून वारंवार करण्यात येतो. शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकार्यांवर टीकेचे वाक्बाण सोडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी मेळाव्यात आमदार चिमणराव पाटील यांनी जाहीर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याविषयी उधळलेल्या स्तुतिसुमनांवर राजकीय वर्तुळात चर्वितचर्वण होत आहे.