जळगाव शहराचे गेल्या पाच वर्षांत गिरीश महाजनांनी वाटोळे केले आहे. महाजनांनी शहर विकासासाठी शंभर-दोनशे कोटी रुपये देण्याच्या फक्त वल्गना केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र निधी आला नाही आणि जो आला त्यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यामुळे आज जळगाव हे शहर नसून एखादे खेडे झालेय. गेल्या पन्नास वर्षांत जळगावची इतकी कधी दुर्दशा झाली नसून, ती आज झालीय. यासाठी कारणीभूत महाजन हे आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. दूध संघ निवडणुकीसाठी आमची पूर्ण तयारी झाल्याचेही सांगत, खासदार संजय राऊत यांच्या सुटकेचा शिवसेनेलाच नव्हे, तर महाविकास आघाडीलाही फायदा होईल, असे खडसे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक: भंगार व्यवहाराच्या वादातून हवेत गोळीबार; सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील घटना

शहरातील निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महापालिकेची आज निवडणूक झाली तर गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांचा एकही सहकारी निवडून येणार नसल्याचा दावा आमदार खडसेंनी केला. जळगाव शहराचे या पाच वर्षांत महाजनांनी वाटोळे करून टाकलेय. गिरीश महाजनांनी सांगितले होते, मी तुम्हाला शंभर कोटी देतो, दोनशे कोटी देतो, मला मतदान करा, नाहीतर एक मत मागायला मी येणार ऩाही, असे गिरीश महाजनांचे शब्द होते आणि ज्या अर्थाने महाजनांनी, सुंदर शहर, स्वच्छ शहर, चांगले शहर बनवू, नाहीतर तुम्हाला तोंड दाखवणार नाही, अशा स्वरूपाचे शब्द वापरले होते. मात्र, त्याच्या उलट जळगाव शहराची अवस्था झालेली आहे. रस्त्यांमधले खड्डे पाहिले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली, गटार पाहिल्या, मच्छर पाहिले, तर मला वाटते जळगाव शहर राहिले नाही, तर त्याला खेड्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसतेय. याला सर्वच जबाबदार आहेत. भाजपची सत्ता होती. भाजपने यात घोळ केला. भ्रष्टाचार केला, अशा तक्रारी आहेत. पाणीपुरवठा योजनांमधील निविदांमध्ये मोठा घोटाळा झालाय, गटार योजनांमध्ये मोठा घोटाळा झालाय, कचरा साफसफाईच्या निविदांमध्ये घोटाळा झालाय, प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, इतक्या खोलवर जळगाव शहरात गेला, त्याचा परिणाम विकासकामांवर झाला. त्यामुळे आता जनता नाराज आहे. आता निवडणुका झाल्या तर आमदारांचा एकही सहकारी नगरसेवका निवडून येणार नाही, अशी स्थिती आहे. लोकांच्या मनात संताप आहे. मी जळगावमध्ये राहतो, आजूबाजूला फिरतो, आता मला वाटतं अशी अवस्था जळगाव शहरातली गेल्या पन्नास वर्षांत कधीच नव्हती. महाजनांनी शहर विकासासाठी मोठा निधी देण्याच्या वल्गना केल्या, प्रत्यक्षात मात्र जळगावची अतिशय खराब अवस्था झाली आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

हेही वाचा >>>नाशिक: सिडको कार्यालयाचे कामकाज आता अंशत: सुरु – मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून निर्णयात बदल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला, त्यावर खडसे म्हणाले की, आता खासदार संजय राऊतांची सुटका झाली. शिवसेनेलाच नाही, तर त्याचा महाविकास आघाडीला निश्‍चित फायदा होईल. एक आक्रमक नेतृत्व, वाघासारखं पिंजर्‍यामध्ये होतं, ते आता बाहेर आलं आणि त्यामुळे मला वाटतं, खासदार राऊत बाहेर आल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, चेतना आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यात कार्य करण्यास अधिक उत्साह दिसेल. भविष्यकाळात राऊत यांचे मार्गदर्शन सामनाच्या माध्यमातून मिळेल, अशी अपेक्षाही आहे. महाराष्ट्रात इतक्या खालच्या स्तरावरील राजकारण मी कधीही अनुभवलेले नव्हते. आता संस्कारही राहिले नाहीत आणि संस्कृतीही दिसत नाही. ज्याला आहे, मंत्र्यांमध्ये तर महिलांचा अपमान करण्याची स्पर्धा लागलेली दिसते. आपण मंत्री आहोत, समाज आपल्याकडे अपेक्षेने पाहतोय, त्या जबाबदारीचे भान न ठेवता इतक्या खालच्या स्तरावरची चर्चा होते की टीकाटिपणी होतेय. मला वाटतेय, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास जो पूर्वीचा आहे, त्याला कुठेतरी डाग लागतोय, अशी खंतही खडसे व्यक्त केली.

हेही वाचा >>>संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने जळगावात ठाकरे गटाचा जल्लोष

सध्या जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत, त्यावर आमदार खडसे यांनी चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दूध संघाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संघाच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची मुदत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूध संघ बंद अवस्थेत होता, अवसायनात गेला होता. मात्र, अलीकडच्या काळात एनडीडीबीच्या सहकार्याने आणि सध्याच्या संचालक मंडळाच्या मदतीने हा दूध संघ सातत्याने पाच वर्षे नफ्यामध्ये आला, चांगल्या सुस्थितीत आला. त्यामुळे स्वाभाविकतः सर्वांच्या नजरा आता दूध संघावर वळल्या आहेत. आता व्यवस्थापन समिती आमची होती. गेली सात वर्षे आमची व्यवस्थापन समिती होती. गेल्या सात वर्षांत अत्यंत चांगले काम झाले. प्रत्येक सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा प्रस्ताव तयार केला. सातत्याने सहा वर्षे बोनस, दिला, लाभांश दिला. त्यामुळे आता दूध संघाची भरभराट झाली आणि त्यासाठी अनेकांच्या नजरा वळल्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. नाथाभाऊंविरुद्ध सगळे, असे चित्र आज निर्माण झाले आहे. या दूध संघाचे सभासद सुज्ञ आहेत आणि त्यांनी मागच्या कालखंडात जो काही कारभार पाहिला आहे, त्यामुळे त्यांचे समाधान आहे. निवडणुकीत निश्‍चित माझे पॅनल आहे. जे आम्ही उभे करणार आहोत, त्याचा विजय होईल, असा मला विश्‍वास आहे. राष्ट्रवादीच्या स्वतंत्र पॅनलची तयारी केली आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडीचा तसा उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. नंतरच्या कालखंडात काय घडामोडी होतात, हे माहिती नाही. मात्र, खडसे परिवार वगळून सर्वपक्षीय पॅनल करू, असे मत भाजपच्या एका आमदाराने व्यक्त केले होते. खडसेंना वगळून पॅनल होत असेल तर कसे होऊ शकेल? त्यामुळे आमची सर्व तयारी झालेली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय उमेदवारी अर्ज आमच्याकडे उपलब्ध आहेत. जनता आमच्या पाठीशी आहे. जर आवश्यकता भासली तर आम्ही एकत्र न लढविता आमच्या बळावर लढवू शकतो, अशी आजची स्थिती आहे, असेही खडसे म्हणाले.