धुळे : शिरपूर येथील भाजपचे आमदार अमरिश पटेल यांची सावली म्हणून ओळख असलेले आमदार काशिराम पावरा हे सलग चौथ्यांदा शिरपूर मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांना राज्यात सर्वाधिक मते मिळाली आहेत. जलसंधारणाचे शिरपूर प्रारुप, शैक्षणिक केंद्र, आदिवासींना हक्काची जमीन मिळवून देणे आणि विकास या कारणांमुळेच पटेल यांच्या मार्गदर्शनाने पावरा यांना हा विजय शक्य झाला आहे.

आमदार पावरा हे अमरिश पटेल यांचे खास विश्वासू आहेत. शिरपूर मतदार संघ हा पूर्वी खुल्या प्रवर्गासाठी असल्याने तेथून अमरिश पटेल हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत. २००९ मध्ये शिरपूर मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच एसटी प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यामुळे या भागातून आपल्या मर्जीतला आणि विश्वासातील उमेदवार निवडून यावा, यासाठी पटेल यांनी काशिराम पावरा यांना पसंती दिली. पावरा हे अध्यात्मिक आणि निर्मळ स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षात काम करणार्या पावरा यांना संधी देण्याचे ठरविले. परिणामी, शिरपूर मतदार संघ राखीव झाल्यानंतर पावरा यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा कोँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविली आणि विजयी झाले.

हेही वाचा…जळगाव जिल्ह्यात ११७ उमेदवारांची अनामत जप्त

पटेल यांनी पावरा यांना पुन्हा २०१४ मध्ये उमेदवारी देत निवडून आणले. त्या काळात पटेल हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर राज्यात भाजपची लाट पाहून पटेल यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पावरा यांनीही भाजपला जवळ केले. पटेल यांनी पावरा यांना २०१९ मध्ये भाजपचे आमदार म्हणून निवडून आणले. तेव्हा त्यांना एक लाख २० हजार ४०३ मते मिळाली होती. तीन वेळा आमदार होऊनही पावरा यांनी अमरिश पटेल यांची साथ सोडली नाही. त्यांनी पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूर शहरातील वेगवेगळ्या भागात रस्ते, काँक्रिटीकरण, भूमिगत गटारी, वीज व्यवस्था, सांडपाणी शुद्धीकरण, उद्याने, अशा विविध मूलभूत सुविधा पूर्ण केल्या.

हेही वाचा…दरोड्याच्या तयारीतील दोघे ताब्यात

यावर्षी पावरा यांनी भाजपकडून उमेदवारी केली. त्यात ते राज्यात सर्वाधिक एक लाख ७८ हजार ७३ मते घेत सलग चौथ्यांदा निवडून आले. त्यांच्या विजयात पटेल यांचा मोलाचा वाटा आहे. शिरपूर शहरासह तालुक्यात पटेल यांचाच प्रभाव आहे. पटेल, पावरा यांनी शिरपूर तालुक्यात जलसंधारणाची सर्वाधिक कामे केली आहेत. गावोगावी सुमारे ३९० बंधारे बांधून त्यांनी तालुक्यातील जलपातळी वाढविली आहे. विहिरींची जलपातळीही वाढली आहे. त्यामुळे शेकडो गावातील शेती ओलिताखाली आली आहे. शिक्षणाच्या सुविधा, भरीव रोजगार देणारे टेक्सटाईल पार्क, एसव्हीकेएमसारख्या जागतिक शिक्षण संस्थांची सुसज्ज संकुले, वैद्यकीय महाविद्यालय असा आणि यासारख्या कित्येक सोयीसुविधा शिरपूर तालुक्यात उपलब्ध आहेत. आदिवासी मुलांसाठी स्वतंत्र सैनिकी शाळा उभारुन त्यांना तेथे शिक्षणाची सुविधाही पटेल यांनी उपलब्ध करुन दिली आहे. पटेल, पावरा यांनी शिरपूर तालुक्यात वनहक्काची प्रभावी अंमलबजावणी केल्याने वनवासी, आदिवासींना त्यांच्या हक्काची शेती मिळाली आहे.