नाशिक: ठाकरे गटाच्या मोर्चावेळी खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप पुराव्यासह सिध्द करावेत, त्यासाठी खुल्या चौकशीस तयार आहोत, असे आव्हान शहरातील आमदारांनी दिले. राऊत हे मनोरुग्ण झाल्याने बेछूट आरोप करत असून अमली पदार्थ माफिया ललित पाटील याला अटक केल्याने ठाकरे गटाचा थयथयाट झाल्याची टीका भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
शहरातील अमली पदार्थांची तस्कीर याविरोधात ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चावेळी खासदार राऊत यांनी शहरातील आमदारांवर अनेक आरोप केले. या आरोपांसंदर्भात पत्रकार परिषदेत आमदारांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी फरांदे यांनी राऊत यांना लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करावीत, पुरावे द्यावेत, शहरातील तीनही आमदार यासाठी खुल्या चौकशीला तयार आहेत, असे सांगितले. काही महिन्यांपूर्वी याविषयी विधानसभेत आम्ही आवाज उठवला होता. ललित पाटील यास मिळालेला राजाश्रय, सुविधा याची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. ललित पाटील यास अटक झाल्यानंतर काढलेला मोर्चा म्हणजे आपले संबंध समोर येऊ नये म्हणून केलेला थयथयाट आहे, अशी टीका केली. आजही लोक सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण विसरलेले नाहीत. त्यावेळी अमली पदार्थ प्रकरण का दाबले गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा… नाशिक : सप्तशृंग गडावर भाविकांनी सहकार्य करावे – पोलिसांचे आवाहन
राहुल ढिकले, सीमा हिरे या आमदारांनीही आरोप फेटाळले असून आम्हाला कुठल्याही प्रकारचे हप्ते येत नाहीत. राऊत यांनी नावे जाहीर केल्यास पुढील कायदेशीर लढाई लढू, असा इशारा देण्यात आला.
शिवसेनेचीही टीका
अमली पदार्थ माफियांसोबत ठाकरे गटाच्या नेत्यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. पोलीस तपासात ठाकरे गटाच्या तथाकथित नेते मंडळींची चौकशी होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आणलेल्या महिलांना मोर्चा कसला, हे माहीत नव्हते, राऊत यांनी हा भाडोत्री मोर्चा काढला, अशी टीका शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केली.