नाशिक – नाशिक गरीब कुठे आहे, नाशिक तर श्रीमंत आहे, या विधानाने अडचणीत आलेल्या मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सोमवारी रात्री प्रशासनाच्यावतीने घाईघाईत पत्रकार परिषदेत घेत पाणीपट्टी व मलजल शुल्क आकारणीला स्थगिती देऊन गदारोळ शमविण्याचा प्रयत्न केला. सहायक्क आयुक्त प्रदीप चौधरी यांनी पाणीपट्टी व मलजल शुल्क आकारणीला स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले.
महानगरपालिकेने पाणीपट्टीत ३०० पट वाढ करण्याचे कारण माजी महापौर दशरथ पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांना विचारले होते. नाशिक हे गरीबांचे शहर आहे, त्यांच्यावर इतका बोजा टाकणे अयोग्य असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधताच मनपा आयुक्तांनी उपरोक्त विधान केले. आयुक्तांच्या विधानावर पाटील यांनी आक्षेप नोंदविला. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर दरवाढीच्या मुद्यावरून मनपा आयुक्तांना माघार घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना दणका दिल्याची चर्चा मनपा वर्तुळात होत आहे.
हेही वाचा – इगतपुरी तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा तडाखा; भातशेतीचे नुकसान
महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. राजकीय दबाव नसल्याने प्रशासनाने पाणीपट्टीत तिप्पट दरवाढ करण्याचा विषय अलीकडेच स्थायी समितीत मंजूर केला होता. इतकी प्रचंड दरवाढीचे कारण विचारण्यासाठी माजी महापौर पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता. २०१८ मध्ये पाणीपट्टीचे दर प्रति हजार लिटर तीन रुपये ६० पैसे होते. २०१९ मध्ये ते पाच रुपये झाले. तेव्हा देखील शहरवासीयांसाठी गंगापूर धरणातून पाणी उचलले जात होते, असा दाखला पाटील यांनी दिला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेला १० हजार कोटींचा निधी मिळवायचा आहे. त्यासाठी पाणीपट्टीत महापालिकेने ३०० पट वाढ केल्याचा आरोप पाटील यांनी केला. इतकी प्रचंड वाढ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देखील करणार नाहीत. मनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून कोट्यवधींच्या निविदांना मान्यता दिली. ठेकेदारांचे भले करण्यासाठी नाशिककरांवर मोठी दरवाढ लादली गेल्याचा आरोप त्यांनी करत या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याचे आव्हान पाटील यांनी दिले होते.
हेही वाचा – नाशिक : अवकाळी, गारपिटीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान, द्राक्ष, कांदा, भात भुईसपाट
भ्रमणध्वनीवर आयुक्तांनी केलेल्या विधानाने चांगलाच गदारोळ उडाला. आयुक्त डॉ. करंजकर हे नाशिकमध्ये नव्हते. पाणीपट्टीच्या मुद्यावर सहायक आयुक्त प्रदीप चौधरी यांनी रात्री तातडीने पत्रकार परिषद घेत पाणीपट्टी दरवाढ आणि मलजल शुल्क आकारणीला स्थगिती देत असल्याचे सांगितले. मनपा आयुक्तांनी केलेल्या विधानाबाबत आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले. पालकमंत्री दादा भुसे आणि मनपा आयुक्तांमध्ये याबाबत चर्चा झाली. त्यानुसार दरवाढीला स्थगिती दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. माजी महापौर दशरथ पाटील यांच्या दणक्यामुळे महापालिकेला पाणीपट्टीतील दरवाढ आणि मलजल शुल्क आकारणीला स्थगिती द्यावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.