नाशिक : स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत कलह पाहून नाराज झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीन दिवसांचा नाशिक दौरा दीड दिवसातच आटोपता घेत शुक्रवारी मुंबईकडे प्रयाण केले. जुन्या कार्यकर्त्यांनी काही पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रारीचा सूर लावला होता. यामुळे शहर आणि जिल्हा संघटनेत लवकरच खांदेपालट होईल, असे राज यांनी बैठकीत म्हटले होते. रुसवे-फुगवे बाजूला ठेवून महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मुंबईला निघून गेले.

राज ठाकरे यांचा नाशिक दौरा तीन दिवसीय असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. गुरुवारी दुपारी दाखल झालेले राज हे शुक्रवारी सकाळी मार्गस्थ झाल्यामुळे पक्षाच्या वर्तुळात वेगळेच अर्थ लावले जात आहेत. आदल्या दिवशी राज यांनी गटनिहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्याची माहिती दिली होती. या चर्चेत पक्षांतर्गत खदखद उघड झाली. जुन्या कार्यकर्त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, पक्ष वाढविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले, अशा अनेक तक्रारी झाल्यामुळे मुंबईतील मनसेच्या मेळाव्यानंतर शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत बदल करण्याची तयारी राज यांनी दर्शविल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

महापालिका निवडणुकीला चार ते पाच महिन्यांचा कालावधी आहे. निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने रुसवे-फुगवे बाजूला ठेवून कामाला लागा, असे राज यांनी सूचित केले. प्रत्येकाच्या कामाचा अहवालातून आढावा घेतला जाईल. कोणत्याही विषयावर तुम्ही थेट संपर्क साधू शकता, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. पक्षांतर्गत गटबाजीमुळे राज ठाकरे हे नाराज झाले होते. यामुळे दौरा आटोपता घेऊन शुक्रवारी ते लगेचच मुंबईला निघून गेल्याचे सांगितले जाते.

Story img Loader