नाशिक – दत्तक मूल आम्हाला परत करा. दत्तक मुलाचे लाड होतात. परंतु, इथे मात्र उलट झाले आहे. दत्तक मूल बिघडले आहे, अशी खरमरीत टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मनसे नेते संदीप देशपांडे, संदीप जाधव यांनी शहरातील विभाग अध्यक्ष, शाखा अधिकारी यांच्या बैठका घेत येथील परिस्थिती जाणून घेतली. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष पातळीवर काय काम सुरू आहे, याची चाचपणी करण्यात आली. यावेळी देशपांडे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेकांनी पाच वर्षापूर्वी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक द्या, अशी साद घातली होती, याची आठवण सांगितली. नाशिककरांनी मूल दत्तक दिले. परंतु, या दत्तक मुलाचे लाड झालेच नाहीत. उलट ते बिघडले. असा सूर बैठकीत उमटला. या पार्श्वभूमीवर आमचं दत्तक मूल परत करा, अशी उपरोधिक मागणी देशपांडे यांनी केली. दत्तक मूल आम्हाला परत करा. याआधी राज साहेबांनी ज्या पध्दतीने नाशिकचे संगोपन केले. त्याच धर्तीवर शहराचा पुन्हा विकास केला जाईल, असे देशपांडे यांनी नमूद केले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीचा अहवाल पक्ष प्रमुखांना देण्यात येणार असून त्यानुसार पुढील नियोजन होईल, असे देशपांडे यांनी सांगितले.