नाशिक : भाजपने तिकीट वाटपात डावलल्याने बंडाचे निशाण फडकविणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना मनसेने नाशिक पश्चिम मतदार संघातून मैदानात उतरविले आहे. पाटील यांच्या उमेदवारीने ही लढत रंगतदार होणार आहे. मध्यंतरी नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांनी कोणत्या भागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे, याचा अभ्यास करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली होती. त्या आधारे मराठा समाजातील नाराज पाटलांना पक्षात प्रवेश देतानाच लागलीच उमेदवारी बहाल करण्याची चाल मनसेने खेळली आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला संबंधितांनी जाहीर विरोध केला होता. तथापि, पक्षाने त्यास न जुमानता पहिल्याच यादीत हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मनसेत पक्ष प्रवेश होऊन उमेदवारी निश्चित झाली. मनसेने पहिल्या यादीत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. मात्र, त्यामध्ये नाशिकचा समावेश नव्हता. पाटील यांच्या प्रवेशानंतर तिसऱ्या यादीत नाशिक पश्चिमचा समावेश झाला आहे.
हेही वाचा…जे. पी. गावित चार कोटींचे धनी, सहा महिन्यांत २५ लाखांपेक्षा अधिकची भर
u
i
नाशिक पश्चिम मतदारसंघात गंगापूर, सातपूर, अंबड, चुंचाळे, मोरवाडी, कामटवाडे अशा आठ ते १० गावांचा समावेश आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे. मतदारसंघाचा बराचसा भाग कामगारबहुल असून कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) भागातून स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी आहे. या सर्व बाबी मनसेनेही विचारात घेतल्याचे दिसून येते.
हेही वाचा…नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत
मतांची टक्केवारी कशी ?
नाशिक पश्चिम मतदारसंघात नितीन भोसले यांच्या माध्यमातून २००९ मध्ये पहिल्यांदा मनसेचा आमदार निवडून आला होता. तेव्हा पक्षाला ३५ टक्के मते मिळाली होती. त्यापुढील २०१४ च्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ४.४ पर्यंत घसरून भोसले हे पराभूत झाले होते. गतवेळी म्हणजे २०१९ मध्ये मनसेच्या दिलीप दातीर यांना ११.८ टक्के मते मिळाली होती. सलग दोनवेळा गमवाव्या लागलेल्या या जागेवर पक्षाने यावेळी वेगळा प्रयोग केला आहे.