नाशिक – पाकिस्तानने भारतावर २०१६ साली उरी आणि २०१९ यावर्षी पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यानंतर भारताच्या सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलावंतांना भारतात कार्यक्रमास बंदी घातली. परंतु, या बंदीला झुगारून फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची जाहिरात नाशिकरोड येथील रेजिमेंटल मल्टिप्लेक्समध्ये लावण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित करु नये, यासाठी मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जाहिरातीचा फलक जाळून निषेध केला.
हेही वाचा >>> नाशिक: पूर्ववैमनस्यातून गुंडाची हत्या, सहा जण ताब्यात
पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच दिला आहे. असे असतानाही रेजिमेंटल मल्टिप्लेक्समध्ये पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाचा फलक लावण्यात आल्याने मनसे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी फलक जाळून निषेध केला. चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने नाशिकमधील सर्व मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांना दिला. यावेळी शहर संघटक ॲड. नितीन पंडित यांनी, पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित केल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा दिला. जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, मनोज घोडके, कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे आदी उपस्थित होते.