लोकसत्ता वार्ताहर
धुळे – टोलसंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी धुळे तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान टोल नाक्यावर उपस्थित राहून दोन्ही बाजूने वाहनांना विना पथकर (टोल) रस्ता मोकळा करून दिला.
आणखी वाचा-जामनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत धुळ्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकाळीच अवधान टोल नाक्यावर उपस्थित राहून वाहनांना पथकर न भरता सोडण्यास सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व चारचाकी आणि हलक्या वाहनांना टोल नाक्यावर टोल लागत नसल्याचे वक्तव्य असलेली चित्रफित दाखवून अवधान येथील नाक्यावरुन लहान गाड्यांना कार्यकर्त्यांनी मार्ग मोकळा करून दिला. आपण जिथे जात असाल तेथील नाक्यांवर टोल भरू नका, असे आवाहनही यावेळी वाहनधारकांना करण्यात आले. मनसेचे शहराध्यक्ष बंटी सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.