डाळींसह अन्नधान्याचे दर गगनाला भिडल्यामुळे काही दिवसांपूर्वी मनसेने मुंबई व परिसरात गोदामात धडक देऊन साठे पकडण्याचे आंदोलन केले असताना नाशिकमध्ये मात्र या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यावर समाधान मानले. महागाईच्या मुद्यावरून पक्षाला उशिराने जाग आल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे आंदोलकांनी ऐनवेळी जायकवाडीला पाणी सोडण्याचा विषयही समाविष्ट केला. महामोर्चा असे नाव मोर्चाला दिले गेले असले तरी बरीच धडपड करूनही पदाधिकाऱ्यांना अपेक्षित गर्दी जमविता आली नाही. मुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील पाणीटंचाईवरून कंठशोष करणारे आंदोलक बाटलीबंद पाण्याने तहान भागविताना पहावयास मिळाले.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, डाळी व अन्नधान्याच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याच्या मुद्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आधीच आंदोलन केले होते. दरम्यानच्या काळात शासनाने डाळींचे भाव आटोक्यात येतील या दृष्टीने कारवाई सुरू केली. या घडामोडी घडत असताना कल्याण-डोबिंवली महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि मग मनसेला आंदोलनाची उपरती झाल्याचे अधोरेखित झाले. नाशिकच्या विकासाचे ढोल वाजवूनही तेथील निवडणुकीत मनसेचे इंजिन धावले नाही. या निवडणुकीच्या तोंडावर मुंबई व परिसरात डाळींचे साठे पकडण्यासाठी धडपड केली होती. परंतु, मुंबईत आंदोलन सुरू असताना नाशिकमधील पदाधिकारी मौन बाळगून होते. उपरोक्त निवडणुकीत नाशिकच्या विकासाची मात्रा लागू न पडल्याने स्थानिक पदाधिकारी सावध झाल्याचे या मोर्चाने दर्शविले.
प्रदेश पदाधिकारी राहुल ढिकले, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे आदींच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या राजगड कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. वाढती महागाई आणि मराठवाडय़ाला पाणी सोडण्याच्या विषयावरील फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले. धरणांमधील पाणी सोडल्यामुळे नाशिकमध्ये पुढील काळात मोठी पाणी कपात करणे भाग पडणार आहे. या निर्णयास मुख्यमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री जबाबदार असल्याची तक्रार मोर्चेकऱ्यांनी केली. मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नगरसेविका सुजाता डेरे या रिकामा हंडा घेऊन सहभागी झाल्या. गर्दी जमविण्यासाठी एरवी अवलंबिले जाणारे सर्व मार्ग पदाधिकाऱ्यांनी अनुसरले. परंतु, अपेक्षित गर्दी काही जमली नाही. मुख्य मार्गावरून मोर्चा शालिमारमार्गे महात्मा गांधी रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत झाली. ती पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागला.
टंचाईचा कंठशोष अन्..
मराठवाडय़ास पाणी दिल्यामुळे नाशिकमध्ये जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत आंदोलन करणारे मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात पॅकबंद बाटलीतील पाण्यावर आपली तहान भागवत होते. जनसामान्यांच्या प्रश्नांवर कळवळा दाखवायचा आणि प्रत्यक्षात वेगळेच आचरण करायचे असा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. पॅकबंद बाटलीतून तहान भागविणाऱ्या आंदोलकांना टंचाईची झळ जाणवेल काय, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.