खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढल्याने आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष अचानक सक्रिय झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेच्यावतीने मंगळवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवून, मडकी फोडत महापालिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

मनसेतर्फे मंगळवारी महापालिकेच्या राजीव गांधी भवन प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांच्या समस्येवर माजी महापौर दशरथ पाटील यांनी मागीलवर्षी याचिका दाखल केली आहे. त्यांच्याकडून विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघात खड्ड्यांचा पंचनामा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्षांना शहरवासीयांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भूमिका घेणे भाग पडत आहे. मनपाच्या मुख्यालयासमोर मनसेने ढोल वाजवून, मडकी फोडून महानगरपालिकेचा निषेध केला.

हेही वाचा >>> इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

महापालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चांगले रस्ते गॅस वाहिनी टाकण्यासाठी खोदले गेले. नंतर त्यांची दुरुस्ती केली गेली नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणेशोत्सवात नागरिकांना त्रास होणार असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. नवीन रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम निकृष्ट दर्जाचे असून याची चौकशी करून संबंधितांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे. ढोल वाजवून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला जात असून पाच दिवसात सर्व खड्डे डांबर टाकून न बुजविल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, प्रमोद साखरे आदींच्या नेतृत्वाखाली देण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns protest in front of nashik municipal corporation entrance against potholes on roads zws