जळगाव – देखभाल आणि दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा प्रवाशांसह चालकांसाठीही जणूकाही एखाद्या जत्रेतील मौत का कुंवा सारखी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य आगारांच्या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. अशा बसेसमधून प्रवाशांची वाहतूक केली जात असताना, मालेगाव ते पाचोरा प्रवासादरम्यान आलेल्या एका भयंकर अनुभवाची चित्रफित मनसे विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण दुंदुले यांनी समाज माध्यमात टाकली आहे. दणदणाट आवाज करणाऱ्या पुणे-पाचोरा बसचे थरथरणारे स्टेअरिंग सांभाळताना चालकाचे होणारे हाल आणि बसमधील प्रवाशांच्या अंगाचा उडालेला थरकाप या माध्यमातून उघड झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> येवला, लासलगाव आगारांना बसेसचा तुटवडा, कार्यवाही करण्याची छगन भुजबळ यांची मागणी

पाचोरा आगाराची पुणे ते पाचोरा ही बस (एमएच २०-बीएल २४०९) पुण्याहून अहिल्यानगर-शिर्डी-मनमाड-मालेगाव-चाळीसगावमार्गे पाचोरा अशी धावते. २५ डिसेंबर रोजी बसमध्ये मालेगाव येथून पाचोरा जाण्यासाठी बसल्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण दुंदुले यांना बसची जी स्थिती दिसली, ती सर्वांसमोर येण्यासाठी आणि चालक कसे जीवावर उदार होऊन बस चालवतात, ते दाखविण्यासाठी चित्रफित तयार करुन समाज माध्यमात टाकली आहे. रस्त्यावर खड्डे नसतानाही बसचे थरथरणारे स्टेअरिंग हाताळताना चालकाचाही थरथराट होत आहे. त्यामुळे बस केव्हाही अनियंत्रित होऊन प्रवाशांच्या जीवावर कशी उठू शकते. नादुरूस्त बस चालवण्यास नकार दिल्यावर चालकास कामावरून काढून टाकण्याची तंबी दिली जाते, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चित्रफितीतून करण्यात आला आहे.  बसचे स्टेअरिंग थरथरत असतानाही पुण्याहुन निघालेली बस पाचोरा स्थानकापर्यंत सुखरूप आणल्याबद्दल संबंधित चालकाचे कौतुक देखील दुंदुले यांनी केले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात होऊन आतापर्यंत कित्येक प्रवाशांचे जीव गेले आहेत. त्यानंतरही महामंडळ नादुरूस्त बसमधून प्रवाशांची सर्रास वाहतूक करताना दिसून येते. हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे, असेही दुंदुले यांनी नमूद केले आहे.

पाचोरा आगाराच्या व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार मनसे विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण दुंदुले यांनी पुणे-पाचोरा बसमधील प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या पाचोरा आगार व्यवस्थापकांकडे त्याविषयी लेखी तक्रार केली आहे. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आपण सदर चित्रफित समाज माध्यमात टाकल्याचे सांगून अशा नादुरूस्त बस तातडीने भंगारात काढाव्यात. चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी न खेळता त्यांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns student wing leader share video on social media of terrifying experience journey st bus from malegaon to pachora zws