नाशिक : चेन्नई ते जोधपूर रेल्वेगाडीत बसण्याच्या जागेच्या वादातून दोन फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे रेल्वेत जमावाने दोघा तरुणांवर शस्त्रांनी वार करुन जबर जखमी केले होते. यातील एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी गती देण्यात आली होती. अखेर नंदुरबार पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी नऊ संशयितांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू, लाकडी दांडादेखील जप्त करण्यात आला आहे.
चेन्नई-जोधपूर या रेल्वेने दोन फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील निंबो या गावाचे करणसिंह जबरसिंह हे लहान भाऊ सुमेरसिंह जबरसिंह (२७), महेंद्रसिंह जबरसिंह (२५), अनुपसिंह जबरसिंह (२३) तसेच त्यांच्या गावातील असलसिंह डुंगरसिंह यांच्यासह प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकात बसण्याच्या कारणावरून काही जणांशी वादविवाद झाला. नंदुरबार येथे रेल्वे पोहचली असता आठ ते १० जणांच्या टोळक्याने रेल्वे डब्यात प्रवेश करुन सुमेरसिंह जबरसिंह यांच्या डाव्या पायाच्या मागील बाजूस चाकूने वार करून गंभीर जखमी केले. परबतसिंह यांच्या पाठीवर चाकूने वार केले. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघा जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सुमेरसिंह जबरसिंह यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुन्ह्यात वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून लोहमार्ग व नंदुरबार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत संशयित विजय पगारे (३६, रा.गौतमनगर, नंदुरबार), सोहिल शेख (२८), रोहित पगारे (१९), रूपेश कांबळे (३०), एजाज शेख (२४), जयदीप काशीकर (२३), प्रथम उर्फ दादू पगारे (२१), मिहीर अभंगे (२१) आणि एक विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
सदर गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू तसेच लाकडी दांडा हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर, लोहमार्ग मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस निरीक्षक अमित मनेळ, सहायक निरीक्षक गंभीरराव, राहुल शेजवळ, बसंत रॉय, संजय पाटील, हवालदार विकास पाटील, प्रकाश गोसावी, किरण बोरसे, कैलास चौधरी, जितेंद्र चौधरी यांच्या पथकाने केली