जिल्हाधिकारी कार्यालयावर दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अकस्मात वाजलेल्या भोंग्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही कामानिमित्त आलेले नागरिक भीतीने धास्तावले. कार्यालयात दहशतवादी शिरले आहेत आणि त्यांनी काही कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहेत असे वृत्त कळताच येथील सर्वामध्ये घबराट पसरली. सूचना मिळताच कर्मचारी, अधिकारी, सर्वसामान्य नागरिकांची कार्यालयाबाहेर जाण्यासाठी धावाधाव झाली. नंतर  सुरक्षा यंत्रणेने दहशतवादाचा खात्मा केल्याचा वेगवान थरार पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार म्हणजे म्हणजे रंगीत तालीम असल्याचे समजल्यावर सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला.

१३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अंतर्गत आपत्ती निवारणाविषयी जनजागृती करून यासंबंधी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आयोजित ही रंगीत तालीम सर्वसामान्यांना बुचकळ्यात पाडणारी ठरली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली रंगीत तालीमद्वारे आपत्ती निवारण दिवस साजरा करण्यात आला.

आपत्कालीन स्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून सर्वाना एकाच वेळी सूचना दिल्याने परिस्थतीवर जलद नियंत्रण मिळवणे सुलभ झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. रंगीत तालीम झाल्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन केले. रंगीत तालीमचे निरीक्षण निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर, नागरी सुरक्षा दलाचे अतुल जगताप आदींनी केले. रंगीत तालमीत दहशतवाद विरोधी पथक व शीघ्र कृती दलातील ४० कमांडो, अग्निशमन दलाचे सात अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. प्राधिकरणाच्या शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सर्वांना सावधानता बाळगण्यासाठी सूचना दिल्या.

एकाच वेळी ‘व्हॉईस कॉल’च्या माध्यमातून सूचना

एरवी, सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय गजबजू लागते. मंगळवारी फारसे वेगळे चित्र नव्हते. अधिकारी व कर्मचारी आपापल्या कक्षात कामास सुरुवात करत होते. विविध कामानिमित्त नागरिकही येण्यास सुरुवात झाली होती. अकस्मात तीन दहशतवादी गोळीबार करत कार्यालयात शिरले आणि त्यांनी काही कर्मचाऱ्यांना बंदी बनविले. मुख्य प्रवेशद्वारावर बॉम्ब ठेवला गेल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. आपत्कालीन धोक्याचा भोंगा वाजवून सर्वाना इशारा दिला गेला. अकस्मात वाजलेल्या भोंग्यांनी अधिकारी व कर्मचारी धास्तावले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाचवेळी ‘व्हॉईस कॉल’च्या माध्यमातून सूचना दिली. कार्यालय सोडून तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले गेले. सर्वाना एकाच वेळी संदेश मिळाल्याने अधिकारी-कर्मचारी काही क्षणात कार्यालयाबाहेर पडले. तत्पूर्वी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षालाही देण्यात आली होती. शीघ्र कृती दलाचे अधिकारी व जवानांनी धाव घेऊन संपूर्ण इमारतीला घेराव टाकला. काही वेळात दहशतवादविरोधी पथकाच्या जवानांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घालत कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. श्वान पथकाने बॉम्बचा शोध घेतल्यावर तो सुरक्षित स्थळी नेऊन निकामी करण्यात आला.