नाशिक : विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना माघारीनंतर प्रचाराची दिशा स्पष्ट होत आहे. शहर परिसरात दिवाळीतही प्रचार सुरू असताना ग्रामीण भागात मात्र काहीशी शांतता आहे. लोककला, वासुदेव या ग्रामीण भागातील परंपरांसह आधुनिक डिजिटल माध्यमांचा आधार शहरी भागात प्रचारासाठी घेतला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक निवडणुकीत प्रचारामध्ये नवनवीन पध्दती पाहावयास मिळतात. जुन्या काही पध्दती कायम ठेवत आधुनिकतेचीही कास धरली जाते. कोणत्या पध्दतीव्दारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचता येईल, याकडे राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून लक्ष दिले जाते. मागील काही वर्षात प्रचाराच्या पध्दती बऱ्याच बदलल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रिक्षा किंवा अन्य फिरत्या वाहनांतून ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत असे. प्रचाराच्या या वाहनांमधून ग्रामीण भागात लहान मुलेही प्रचारात उतरत असत. अजूनही प्रचारात वेगवेगळी चारचाकी वाहने, दुचाकी यांच्यावर उमेदवारांचे छायाचित्र लावत पक्षचिन्हाची माहिती देत प्रचार केला जातो. सध्याच्या विधानसभा निवडणुकीतही अशाप्रकारे प्रचार केला जात असून काही ठिकाणी माहिती पत्रकांचा आधार उमेदवारांकडून आपली भूमिका मांडण्यासाठी घेतला जात आहे.

हेही वाचा…देवळालीत नेमका कोणाचा प्रचार करावा? शिंदे गटासमोर संभ्रम

u

शहरातील काही उमेदवारांनी वासुदेवांना बोलावून त्यांच्या हातात माहिती पत्रके देत प्रचाराला सुरूवात केली आहे. याशिवाय प्रसिध्द गाण्यांच्या चालीवर उमेदवाराचे नाव, त्याने केलेली विकासकामे, अशी माहिती देण्यात येत आहे. मोठ्या नेत्याची एकच विशाल सभा घेण्याची परंपरा अनेक वर्षांची आहे. ही परंपरा अजूनही कायम असली तरी मागील काही निवडणुकांपासून शहरात चौकसभांना अधिक महत्व आले आहे. चौकसभांव्दारे वेगवेगळ्या भागात जाऊन थेट मतदारांशी संपर्क साधत त्यांच्याशी जवळीक साधता येते. त्यामुळे सध्या चौकसभांवर उमेदवारांकडून भर देण्यात येत आहे. दुसरीकडे, समाज माध्यमांचा प्रचारासाठी वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सर्वच उमेदवारांचे समर्थक वेगवेगळ्या व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमांतून प्रचार करीत आहेत. यासाठी उमेदवारांशी संबंधित काही दृकश्राव्य चित्रफिती. काही संदेश याची देवाण-घेवाण होत आहे. समाज माध्यमांवरील या प्रचारांवर निवडणूक आयोगाकडून लक्ष ठेवले जात आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे काय, हे पाहिले जात आहे.

हेही वाचा…पंतप्रधानांच्या सभेमुळे शहरात ड्रोन उडविण्यास बंदी, पोलिसांकडून सुरक्षिततेचे उपाय

ग्रामीण भागात बैठकांवर जोर

शहरातील प्रचारापेक्षा ग्रामीण भागात उमेदवारांना मतदारांपर्यंत जाण्यासाठी जाहीर सभांशिवाय वेगळ्या पध्दतींचा अवलंब करावा लागतो. उमेदवारांच्या समर्थकांकडून बैठकांवर भर देण्यात येत आहे. या बैठका रात्री पारावर, चौकात, मंदिरात होत आहेत. युवापिढीपर्यंत व्हॉटस ॲपच्या माध्यमातून संदेशाची देवाण- घेवाण सुरू आहे. लोककलेच्या माध्यमातून मतदान जागृतीच्या नावाखाली प्रचार केला जात असल्याचेही दिसून येते. महिला सक्षमीकरणाचा गुलाबी रंग वापरत ग्रामीण भागात बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी काही फलक तयार करुन उमेदवार आणि एखाद्या महिलेचे छायाचित्र वापरत माझे मत अशी जाहिरात होत आहे. काही कार्यक्रम आयोजक गटांकडून पथनाट्य, लोकगीतांचा आधार घेत प्रचार सुरू आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modern digital media along with rural traditions folk art vasudeva are being used for election promotion in urban areas sud 02