Mohammad Siraj and Rohit Sharma praised by Shoaib Akhtar: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया चषक २०२३ च्या ट्रॉफीवर कब्जा केला आहे. आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या शानदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने २६३ चेंडू शिल्लक असताना १० गडी राखून विजय मिळवला. आशिया चषक २०२३ मधील श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामना टीम इंडिया इतक्या लवकर संपवेल, असे कोणालाच वाटले नव्हते. टीम इंडियाच्या या चमत्कारिक विजयाने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही हैराण झाला आहे.
भारताच्या विजयावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलं आहे. वास्तविक तो म्हणाला की, रोहित शर्माच्या कर्णधारपदात बरीच सुधारणा झाली आहे. तो म्हणाला, ‘रोहित शर्मा… गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भटकणारा कर्णधार आज तुम्हाला मिळाला आहे.’ त्याने मोहम्मद सिराजचेही कौतुक केले आणि आगामी सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीबद्दलही चर्चा केली.
रोहित शर्माच्या कर्णधारपदात सुधारणा झाली आहे –
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, ‘रोहित शर्माच्या कर्णधारपदात सुधारणा झाली आहे. तो आणि संघ व्यवस्थापन मोठे निर्णय घेत आहेत. भारताने श्रीलंकेला अशा प्रकारे पराभूत करण्याची कल्पनाही केली नव्हती. येथून, भारत विश्वचषकातील सर्वात धोकादायक संघ असल्याचे सिद्ध होऊ शकते, परंतु मी इतर संघांना कमकुवत म्हणत नाही. कारण सर्व संघ जबरदस्त आहेत.’
यासोबतच रावळपिंडी एक्स्प्रेसने मोहम्मद सिराजचे कौतुक केले आणि त्याला आपला आवडता म्हणून संबोधले. तो म्हणाला की, ‘सिराजने खूप चांगली कामगिरी केली. त्याने भारताला विजय मिळवून दिला. तसेच, त्याने ग्राउंड स्टाफला बक्षिसाची रक्कम देऊन खूप चांगले काम केले. भारत विश्वचषकात पूर्ण आत्मविश्वासाने उतरेल.’ रावळपिंडी एक्सप्रेस पुढे म्हणाला की, ‘भारताने अंडरडॉग म्हणून सुरुवात केली होती, पण आता मला वाटते की ही केवळ पाकिस्तानसाठीच नाही, तर इतर अनेक देशांसाठीही चिंतेची बाब आहे. यासह भारताने विश्वचषकात आपल्या आगमनाची घोषणा केली आहे.’