झोपडपट्टी, मळे परिसरात संख्या कमी

नाशिक : करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत असून सद्यस्थितीत शहरात १९८० प्रतिबंधित क्षेत्र अस्तित्वात आहेत. पंचवटी, नाशिकरोड आणि सातपूर विभागात त्यांची संख्या अधिक आहे. या क्षेत्राच्या यादीवर नजर टाकल्यास सर्वाधिक १०८६ इमारती असून ७८९ बंगले वा स्वतंत्र घरांचा समावेश आहे. झोपडपट्टी भागात आठ, चाळीत ५९, वाडय़ात २२ आणि मळा परिसरात १२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. प्रारंभी झोपडपट्टी, जुन्या नाशकातील दाटीवाटीच्या वस्तीत शिरकाव करणारा करोना आता शहरातील इमारती आणि बंगल्यांच्या कॉलन्यांमध्ये सर्वदूर पसरल्याचे चित्र आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून एकूण रुग्णसंख्या ३८ हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. यातील ३१ हजारहून अधिक रुग्ण बरे झाले. तर ५९९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५९३३ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नव्याने प्रतिबंधित क्षेत्राची भर पडत आहे. शहरात सर्वाधिक रुग्ण आजही पंचवटी विभागात असून तेथील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ४०८ आहे. नाशिकरोड विभागात ३७५, सातपूर ३६८, नाशिक पश्चिम २८५, नाशिक पूर्व २७५, नवीन नाशिक विभागात २६५ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या क्षेत्राचा विचार करता त्यात सर्वाधिक इमारती आणि बंगले वा स्वतंत्र घरातील रुग्णांचा समावेश असल्याचे दिसून येते. पंचवटी विभागात २३४ इमारती (१३९ बंगले, स्वतंत्र घरे), सातपूर विभागात १७७ (१८२), नाशिकरोड १९० (१६४), नाशिक पश्चिम १८४ (६८), नाशिक पूर्व १९६ (७९), नवीन नाशिक १०५ इमारती (१५७ बंगला, स्वतंत्र घरे) यांचा समावेश असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

नाशिक पश्चिम विभागात करोना रुग्ण आढळल्याने २० वाडे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत. सातपूर येथील एक, पंचवटीतील तन आणि नाशिकरोड, नाशिक पश्चिम विभागातील प्रत्येकी एक झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्रात आहे. नागरी वस्तीलगतच्या मळे परिसरात करोना पोहोचला आहे. शहरातील १२ मळे सध्या प्रतिबंधित आहेत.

Story img Loader