नाशिक: समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची प्रवासी क्षमता १७ अधिक एक म्हणजे चालक धरून १८ अशी होती. वाहनात तब्बल ३५ प्रवासी होते.
समृद्धी महामार्गावर प्रवेश करताना वाहनांचे टायर, प्रवासी क्षमता आणि तत्सम बाबींची तपासणी होते. असे असताना क्षमतेहून दुप्पट प्रवासी घेऊन निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर तपासणी नाक्यावरून कशी मार्गस्थ झाली, यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. संबंधित चालक दोन दिवस वाहन चालवत होता. सलग दोन रात्री त्याची झोप झाली नव्हती. अतिश्रमाने थकवा, अस्वस्थतेची परिणती या अपघातात झाल्याचा प्राथमिक अनुमान प्रादेशिक परिवहन विभागाने काढला आहे.
हेही वाचा >>> नाशिक : घोटी टोल नाक्याजवळ गुटख्यासह ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त
वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्त झालेली टेम्पो ट्रॅव्हलर म्हसरूळ येथील रेणुका ट्रॅव्हलची आहे. नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून तिला योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते. या वाहनास १७ प्रवासी आणि एक चालक अशा १८ जणांच्या वाहतुकीस परवानगी होती, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातावेळी वाहनात क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते. शुक्रवारी रात्री सुमारे ३५ जणांना घेऊन नाशिकहून बुलढाण्याकडे हे वाहन मार्गस्थ झाले होते. दरम्यान, या अपघाताची चौकशी केली जाईल आणि त्यात जे समोर येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.