नाशिक – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने नुकताच एक लाख मराठा उद्योजकांच्या निर्मितीचा टप्पा पार केला. वैयक्तिक व्याज परतावा योजनेंतर्गत राज्यात एक लाख दोन हजार ३७५ नवउद्योजकांना तब्बल ८५८६ कोटींचे कर्ज वाटप होऊन महामंडळाने संबंधितांना आजवर ८३७ कोटींचा व्याज परतावा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेतून १० हजार ६४५ लाभार्थ्यांना ८० कोटींचा परतावा मिळाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे दिली.

महामंडळाने राज्यात एक लाखहून अधिक मराठा उद्योजकांची केलेली निर्मिती आणि महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी ११ वाजता निलगिरी बाग येथील मधुरम सभागृहात एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शून्यातून विश्व निर्माण करणारे जिल्ह्यातील मराठा उद्योजक आणि महामंडळाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत राज्यात ७४७ प्रकरणे बँकेकडून मंजूर करण्यात आली. त्यातून २८६ कोटींचे कर्ज वाटप होऊन संबंधितांना आजवर १८.५६ कोटी रुपयांचा व्याज परतावा दिला गेला आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेतून २३ लाभार्थ्यांना नऊ कोटीचे कर्ज वितरण होऊन ७६ लाखांचा परतावा मिळाला.

हेही वाचा – नाशिक : लाडकी बहीण महाशिबिरावर पावसाचे सावट

हेही वाचा – नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

योजना गाव-पाड्यांपर्यंत नेण्याचा मनोदय

महामंडळाने स्वत: कर्ज पुरवठा केला असता तर इतक्या मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करणे अशक्य होते. मराठा समाजातील मुलांना बळ देण्यासाठी मांडलेल्या व्याज परतावा योजनांचे अनुकरण अन्य विकास महामंडळांकडून होत आहे. या प्रक्रियेत महामंडळाने पारदर्शकता जपली असून सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होतात. पुढील काळात या योजनांचा लाभ गाव व पाड्यापर्यंत पोहोचविणे आणि मोठ्या उद्योगासाठी योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही भाग आदिवासी क्षेत्रात येतो. तेथील बँकांकडून कर्ज प्रकरणे होण्यात काहीशा अडचणी येतात. राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांशी सातत्याने चर्चा करून महामंडळाच्या योजना त्यांच्या लक्षात आणून दिल्या गेल्या. त्यामुळे बँकिंग क्षेत्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.