लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : आठवडे बाजार म्हणजे ग्रामस्थांच्यादृष्टीने जणूकाही जत्राच. चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे भरलेल्या आठवडे बाजारात चांदसणी, पिंप्री, मितावली यांसह आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांसह महिलांनी गर्दी केली होती. बाजारात ग्रामस्थांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. काही ग्रामस्थांना पाणीपुरी इतकी आवडली की त्यांनी ती घरीही नेली. पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मात्र पुढे काही वेगळेच घडले.

मंगळवारी पाणीपुरी खाणाऱ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी असा त्रास जाणवू लागला. सायंकाळी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयांसह अडावद येथील ग्रामीण रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे अडावदच्या रुग्णालयाला तर यात्रेचे स्वरूप आले. यामुळे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. तेथे खासगी डॉक्टरांनीही मदतीसाठी धाव घेतली. तेथे ३० रुग्णांनी उपचार घेतले. रात्री उशिरा १०० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. इतर रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

आणखी वाचा-पंचवटी पोलिसांच्या सहकार्याने अंनिसची ‘भोंदूगिरी शून्यावर’ मोहीम

डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (सात), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुद्राक्षी धनगर (पाच), साक्षी इंगळे (४१), धनराज इंगळे (१५), विद्या इंगळे (३४, सर्व रा. मितावली, पिंप्री, ता. चोपडा) यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाणीपुरीतील खराब बटाट्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विषबाधा झालेल्यांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे.

चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील आठवडे बाजारात खाल्लेली पाणीपुरी चांगलीच महागात पडली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. चोपडा येथील गटविकास अधिकारी रमेश वाघ, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर हे पथकांसह दाखल झाले. आरोग्य यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात आल्या. अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने घेण्यात आले असून, चौकशीअंती संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सहायक निरीक्षक संतोष चव्हाण यांनी सांगितले.

आणखी वाचा-आवक घटल्याने भाजीपाला कडाडला, नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पुरवठ्यात घट

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती जाणून घेत वैद्यकीय अधिकार्‍यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. भाजप अनुसूचित जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, पंचायत समितीचे माजी सभापती डी. पी. साळुंखे आदी पदाधिकार्‍यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची विचारपूस करुन माहिती घेतली.

पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलीस ठाण्यात लेखी जबाब दिला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांनी तातडीने रुग्णालय गाठले आणि रुग्णांची विचारपूस केली.

Story img Loader