लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजारपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती करण्यात येणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. घोटी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे संगोपन महत्वाचे आहे. राज्यात सहा वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह उपक्रमात महाराष्ट्र हे देशात तिसऱ्या क्रमांकावर असून याचे पूर्णश्रेय हे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जाते. सुपोषित भारत अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांत नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. बालकांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा हा अंगणवाडीतून होत असून अंगणवाडी सेविका त्यांचा पहिला गुरू आहे.

हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात लम्पीवर नियंत्रण; पाच लाख जनावरांचे लसीकरण

मूल जन्मास येण्यापूर्वी व जन्मास आल्यानंतरही माता व बालक यांच्या पोषण आहाराची काळजी अंगणवाडी सेविका या जबाबदारीने पार पाडत आहे. डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून पुढील वर्षापासून दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कुटूंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय पोषण अभियानात अधिकाधिक उपक्रम राबवून महाराष्ट्र देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही तटकरे यांनी केले.

हेही वाचा.. जादा परताव्याच्या आमिषाने सहा लाखांना गंडा

सचिव अनुपकुमार यादव यांनी गरोदर महिलांना योग्य पोषण आहार दिल्यास जन्मास येणारे बाळ हे सुदृढ होते, असे नमूद केले. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून अंगणवाडीसोबत गावालाही सुपोषित करण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती दिली.

हेही वाचा… ताशी १३० किलोमीटर वेगाने सहा रेल्वे गाड्या धावण्याची चाचणी यशस्वी; भुसावळ-इगतपुरी विभागात प्रयोग

आमदार हिरामण खोसकर यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देतांना आहाराबाबत योग्य मार्गदर्शन झाल्यास निश्चितच फायदा होईल याकडे लक्ष वेधले. प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यात आयआयटी मुंबई यांच्या समवेत स्तनपान विषयक विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. या माध्यमातून आरोग्य व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभावी स्तनपान व प्रभावी पोषण कार्यक्रमाबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शाळेतील मुलांच्या पोषण आहार दिंडीत मंत्री तटकरे व इतरही सहभागी झाले. राज्यस्तरीय पोषण माह अभियानाचा शुभारंभ फुगे हवेत सोडून करण्यात आला. कार्यक्रमात सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांना अन्न प्राशन कार्यक्रम, गर्भवती माता कौतुक सोहळा, माझी कन्या भाग्यश्री अंतर्गत लाभार्थी यांना धनादेश वाटप, बेबी केअर किटचे वाटप, अंगणवाडी मतदनीस पदावरील नियुक्ती आदेश, महिला बचत गटांना कर्ज धनादेश वितरण, अंगणवाडी सेविका विशेष पुरस्कार आणि गुणवंत अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 17 thousand posts of anganwadi workers and helpers will be recruited in the state along with building availability dvr