नांदुरमध्यमेश्वरमध्ये २० पेक्षा अधिक पक्ष्यांचा मृत्यू

महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या जिल्ह्य़ातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांना हक्काचा निवारा मिळतो. हा निवारा स्थानिक मच्छीमारांमुळे त्यांच्या जिवावर उठला असून मच्छीमारांनी धरण परिसरात टाकलेल्या जाळ्यांमध्ये अडकल्याने २० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या पाश्र्वभूमीवर वन विभागाने तातडीने अभयारण्यालगत असलेल्या गावांना नोटीस बजावली असून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हिवाळ्यात विदेशातूनही असंख्य पक्षी मुक्कामासाठी येतात. यंदा मागील वर्षांच्या तुलनेत पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून पर्यटक, पर्यावरणप्रेमी या ठिकाणी येत असतात. अभयारण्य परिसरालगत ११ गावे आहेत. या गावांच्या बाजूने धरणाचे पाणी जात असल्याने गावातील काही जण मच्छीमारी करतात. त्यांना परंपरेने चालत आलेला व्यवसाय म्हणून मान्यताही आहे.

मात्र त्यासाठी काही विशिष्ट परिसर ठरवून दिलेला आहे. गाव परिसरातील मच्छीमारांनी दिलेली सीमारेषा ओलांडत धरण परिसरात माश्यांना पकडण्यासाठी विस्तीर्ण जाळे टाकले. या जाळ्यात अडकल्यामुळे कळंच, तिरंदाज यांसह अन्य २० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला. तर १५ पक्ष्यांना जखमा झाल्याचे मंगळवारी सायंकाळी उघडकीस आले. अंधार झाल्याने जाळे काढण्यास अडचणी आल्याने बुधवारी सकाळपासून वन विभागाच्या वतीने कामास सुरुवात करण्यात आली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांशी चर्चा करत त्यांना समज दिली. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नये या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

मच्छीमारांचे सर्वदूर जाळे

नांदुरमध्यमेश्वर परिसरातील मच्छीमारांनी धरण फुगवटा परिसरात जाळे टाकले आहे. जाळे लक्षात न आल्याने अनेक पक्षी त्यात अडकून मेले. धरण परिसरात ज्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त आहे, तेथे पक्ष्यांचा मुक्काम जास्त असल्याने हा प्रकार उघडकीस आला. अनेक दुर्मीळ पक्षी दगावले असून परिसरात काही पक्षी आधीच मेल्यामुळे कुजका वास येत आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

– प्रा. आनंद बोरा (पर्यावरणप्रेमी)

गावांना नोटिसा बजावल्या

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यालगत ११ गावे आहेत. प्रत्येक गावातील २० ते २५ कुटुंबे मच्छीमारी करतात. मासेमाऱ्यांच्या जाळ्यांमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गावांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत वनविभागाच्या समिती सदस्यांकडून संबंधितांशी चर्चा करण्यात येत आहे. पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी धरण परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे.

-भगवान ठाकरे (साहाय्यक वनसंरक्षक)

Story img Loader