नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरात टाकलेल्या छाप्यात ३१४ किलो भेसळयुक्त पनीर साठ्यासह इतर साहित्य सामग्री जप्त करण्यात आली. पनीर नाशवंत असल्याने ते लगेच नष्ट करण्यात आले.
हे ही वाचा… नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद
अन्न व औषध प्रशासन विभागाला सिन्नर औद्योगिक वसाहत परिसरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे. यशस्वी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट या ठिकाणी गुरूवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत सखोल तपासणी केली असता पनीर तयार करताना रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करण्यात आल्याचे आढळले. महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित ५३ हजार ३८० रुपये किंमतीचा ३१४ किलो पनीर साठा जप्त केला. नमुना प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. तसेच पनीर तयार करण्यासाठी घटनास्थळी असलेल्या तेल, व्हे परमिटची भुकटी, ग्लिसॉरॉल मोनोस्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व सुरक्षाविषयक काही तक्रार असल्यास संकेतस्थळावर नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.