लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ५०० पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजातील उमेदवार रिंगणात उतरवले जातील तर दिंडोरी या राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या समुदायातील उमेदवारांना उभे केले जाणार आहे.
सकल मराठा समाजाच्या भूमिकेमुळे लोकसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण मिळवून देण्यासाठी मौन बाळगणाऱ्या खासदार, आमदारांविरोधात सकल मराठा समाजाने भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही. समाजाची फसवणूक केली. आरक्षणाबाबत अन्याय केला, अशी मराठा समाजाची भावना झाली आहे. या प्रश्नाबाबत सातत्याने आश्वासने देऊन देखील प्रत्यक्षात काहीही कृती करण्यात आली नाही. समाजाचा भाजपच्या प्रमुख नेत्यावर राग असून त्याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये उमटलेले दिसतील, असे सकल मराठा समाजाचे आंदोलक नाना बच्छाव यांनी सांगितले.
आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज प्रशासन आक्रमक, जेसीबीसह तीन डंपर ताब्यात
नाशिक शहरातील ५० वैद्यकीय व्यावसायिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतील. मराठवाड्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले २०० हून अधिक नागरिक देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या संदर्भात येत्या दोन दिवसात नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. यावेळी विविध कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. किमान ३५० जण उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा अंदाज बच्छाव यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील दिंडोरी हा लोकसभा मतदारसंघ राखीव आहे. तिथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या विविध समुदायातील उमेदवारांना मराठा समाज आपला पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे करणार आहे.
मुंबई येथील आंदोलनात सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्याचेही मान्य केले होते. त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. मराठ्यांना मुंबईत दिलेले आश्वासन विसरणाऱ्या, मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या, निष्क्रिय मराठा खासदार, आमदारांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशारा समाजाने दिला आहे.
आणखी वाचा-रावेर लोकसभेसाठी आपला पहिला क्रमांक; एकनाथ खडसे यांचा उमेदवारीसाठी दावा
निवडणूक मतपत्रिकेकडे नेण्याचा मानस
शासनाच्या धोरणाविरुद्ध समाजात आक्रोश आहे. त्यामुळेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यातून यंत्राऐवजी मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सांगण्यात आले.