नाशिक : गेल्या २४ तासात आठ  करोनाग्रस्त  आढळल्याने जिल्ह्य़ात आता करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५११ वर पोहोचली आहे. शहरासह येवला, मालेगाव, सिन्नर आणि इतर भागात करोनाग्रस्तांची भर पडत आहे. बुधवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्य़ातील ९९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २९ सिन्नरचे होते.

यामध्ये ३० वर्षांच्या कर्मचाऱ्याचा अहवाल हा करोनाग्रस्त असल्याचा प्राप्त झाला. सिन्नर येथील खासगी रुग्णालयात संबंधित व्यक्ती काम करत होती. त्याचा करोनाचा अहवाल प्राप्त होताच त्याच्या संपर्कातील नऊ जणांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. येवल्यातील  ३८ अहवालांपैकी दोन रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे उघड झाले. येवल्यातील मौलाना आझाद रोड परिसरातील १७ आणि १३ वर्षांच्या बालकांना करोना असल्याने त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालेगाव येथील सिध्दार्थ नगरातील ६० वर्षांची वृध्दा, गुलशेरनगरातील एक वर्षांचा चिमुकला, ३२ वर्षांचा युवक, नुमानी नगरातील ४२ वर्षांची व्यक्ती करोनाग्रस्त असल्याचे उघड झाले.

मालेगावात करोना मृतांची संख्या १७ वर

मालेगाव : गुरुवारी आणखी चार करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शहर आणि तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४१७ वर पोहचली असून आतापर्यंत करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या १७ झाली आहे. एकूण २८ जण करोनामुक्त झाले आहेत.

करोना रुग्णांवर उपचारासाठी शहरातील जीवन हॉस्पिटल, मन्सुरा रुग्णालय आणि फरहान हॉस्पिटल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. उपचार घेत असताना ५३ करोना संशयितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या काही संशयित रुग्णांचे अहवाल दोन दिवसांत बाधित असल्याचे आढळून आल्याने करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या वाढली असून आता ती १७ झाली आहे.

गुरुवारी करोना चाचणीचे एकूण ५० अहवाल प्राप्त झाले. त्यात सात अहवाल सकारात्मक असून ४३ अहवाल नकारात्मक आले आहेत. सकारात्मक सातपैकी तीन अहवाल आधीच्या बाधित रुग्णांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे आहेत. बुधवारी रात्री आणखी एकाचा अहवाल सकारात्मक आल्याने दाभाडी येथील बाधितांची संख्या नऊ झाली आहे.

पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या बाधिताचे शहरानजिकच्या चंदनपुरी येथे वास्तव्य आहे. त्यामुळे शहरापाठोपाठ दाभाडी, सवंदगाव आणि चंदनपुरी या ग्रामीण भागातील तीन ठिकाणी करोनाने शिरकाव केला आहे.