नाशिक – नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल ५५ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने बुधवारी दुपारी ६५ टक्क्यांची पातळी गाठली. त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुध्द नगर, नाशिक यांच्यात होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी विराम मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार पावसाळा संपेपर्यंत जायकवाडी ६५ टक्के न भरल्यास गोदावरी खोऱ्यातील वरच्या भागातील धरणांमधून विहित सूत्रानुसार पाणी सोडावे लागते. मागील दुष्काळी वर्षात तशी वेळ ओढावली होती. तेव्हा जायकवाडीत अपेक्षित जलसाठा झाला नव्हता. त्यामुळे मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी-दारणा, पालखेड समुहातील २२ धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागले होते. यंदा प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने नाशिक, नगरमधील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नव्हता. ऑगस्टमध्ये खऱ्या अर्थाने तो उंचावण्यास सुरूवात झाली. पण, दोन्ही जिल्ह्यांत जायकवाडीतील अल्प जलसाठ्याची चिंता होती. या काळातील मुसळधार पावसाने नाशिक, नगरमधील सर्व प्रमुख धरणे तुडुंब भरली. मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सोडावे लागले. याचा लाभ जायकवाडीतील जलसाठा उंचावण्यास झाला. बुधवारी दुपारी जायकवाडी धरणात ५०.३० टीएमसी म्हणजे ६५.६१ टक्के जलसाठा झाला. जायकवाडीने ही पातळी गाठल्याने समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार नाशिक, नगरमधून आता पाणी सोडावे लागणार नाही.

हेही वाचा >>>आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी; युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन

पाणी सोडण्याची गरज नाही

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत ३४ हजार सहा दशलक्ष घनफूट (३४ टीएमसी) आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे २१ हजार ६०० दशलक्ष घनफूट (२१.६ टीएमसी) पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे झाला आहे. यामुळे जायकवाडी ६५ टक्क्यांहून अधिक भरले. सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाने जायकवाडीचा जिवंत जलसाठा अपेक्षेआधीच ६५ टक्के झाला. समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न या वर्षीसाठी निकाली निघाला असून या तत्वानुसार वरील भागातून पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही, असे जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 55 tmc of water for jayakwadi from nashik nagar amy