लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या कायद्याअंतर्ग (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत पहिल्या टप्प्यातील प्रवेश झाले असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २९ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. अद्याप प्रतीक्षा यादीतील दोन हजारांहून अधिक बालकांचे प्रवेश बाकी आहेत. यादीतील प्रवेशांना पुढील काळात मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महत्वपूर्ण असणारी बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या कायद्यातंर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी अद्यापही ‘आरटीई’ प्रवेशांचे घोंगडे भिजत आहे. जिल्ह्यातील ४२८ शाळा या प्रक्रियेत सहभागी असून या माध्यमातून पाच हजार २७१ जागा उपलब्ध आहेत.

आणखी वाचा-आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन

आतापर्यंत तीन हजार १६९ जागांवर प्रवेश झाले असून एक हजार १०२ जागा बाकी आहेत. प्रतीक्षा यादीच्या माध्यमातून प्रवेश सुरू असून २६ ऑगस्ट यासाठी अंतिम मुदत होती. मात्र राज्यात असलेली पूरस्थिती पाहता मुदतवाढ देण्यात आली असून २९ ऑगस्टपर्यंत पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश निश्चित करता येणार आहे. पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून, या कालावधीत पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश संबंधित शाळेत निश्चित करावा लागेल.

मागील १० दिवसात जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील ५५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला असून, एक हजार ५४३ जागा शिल्लक आहेत. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेस लागलेला विलंब, कागदपत्रांची पूर्तता यासह तांत्रिक अडचणी याचा अप्रत्यक्ष परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than a thousand people on waiting list right to education admission process for all mrj