जळगाव: गणेशोत्सवासह आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून मोठ्या प्रमाणात युरिया व रसायनमिश्रित खवा येत असल्याचे नाशिकपाठोपाठ भुसावळमधील कारवाईतून निष्पन्न झाले आहे. गुजरातमधून भुसावळ शहरात खासगी बसमधून आलेला सुमारे पाच टन बनावट खवा मिळून आल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खासगी बसचालकासह मालमोटारचालकाला अटक केली आहे.
राज्यात गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई, तसेच माव्याच्या मोदकांना मोठी मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बनावट खव्याचा वारेमाप वापर करीत अखाद्य खवा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. गणेशोत्सवानिमित्त मोदकांसह मिठाई व पेढ्यांचा प्रसाद वाटप केला जातो. हे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी विक्रेते खव्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. अहमदाबाद ((गुजरात) येथून युरिया व रसायनमिश्रित खवा बुलढाण्याकडे नेण्यात येत असल्यांची व एम. के. बस सर्व्हिसच्या माध्यमातून भुसावळमधून पुढील वाहतुकीसाठी मालमोटारीत भरल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली. त्याअनुषंगाने पथकास कारवाईच्या सूचना दिल्या.
भुसावळ येथील नाहाटा चौफुलीवर पथकाने सापळा रचत संशयास्पद एम. के. बस सर्व्हिसची खासगी बस थांबवून तपासणी केली. बसमध्ये प्रवाशांऐवजी युरिया व रसायनमिश्रित सुमारे पाच टन खवा बॅगमध्ये भरलेला आढळून आला. ३० किलोच्या १३६ बॅग व ४२ खोके मिळून सुमारे ११ लाख ७४ हजार ८०० रुपये किमतीचा सुमारे पाच हजार ३४० किलो बनावट खवा आढळून आला. यामुळे पथकाने खासगी बससह मालमोटारही जप्त केली. खासगी बसचालक कन्नू पटेल (३७) आणि मालमोटारचालक सय्यद साबीर सय्यद शब्बीर (३५, दोन्ही रा. अहमदाबाद, गुजरात) यांना अटक केली आहे. दोघांसह वाहनेही सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्यासह अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी शरद पवार यांच्याकडे पुढील कारवाईसाठी वर्ग करण्यात आली. जप्त करण्यात आलेली वाहने भुसावळ येथील तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आली आहेत.