नाशिक: हिट ॲण्ड रन प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात वाहतुकदारांंनी पुकारलेल्या संपामुळे शहरातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. जिथे पेट्रोल शिल्लक आहे, तिथे वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. धास्तीमुळे अनेकजण गरजेपेक्षा अधिक इंधन वाहनात भरत असल्याने कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याकडे फामपेडाचे राज्य उपाध्यक्ष विजय ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. संपामुळे नाशिक, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांतील पुरवठा खंडित झाल्यामुळे अभूतपूर्व इंधन टंचाई निर्माण झाली आहे. आंदोलकांनी पेट्रोलपंप चालकांचे टँकर भरू दिले नाही. तेल कंपन्यांच्या प्रकल्पातील स्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे मंगळवारी मनमाडकडे रवाना झाले आहेत. पोलीस बंदोबस्तात वितरकांच्या टँकरमधून वितरण सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी रात्री उशिरापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मनमाडलगतच्या पानेवाडीस्थित इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, एचपीसीएल, आयओसी या चार प्रमुख इंधन कंपन्यांमधून इंधन पुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही. या प्रकल्पांतून नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मराठवाड्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांत इंधन व घरगुती गॅसचे वितरण केले जाते. १२०० ते १४०० टँकर हे काम करतात. ही सर्व वाहतूक बंद आहे.

हेही वाचा… जळगावमध्ये पेट्रोलपंपावर पहाटेपासून वाहनांच्या रांगा

वितरण ठप्प झाल्यामुळे सर्वत्र इंधन टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नाशिक शहरातील अनेक पेट्रोल पंपातील साठा संपुष्टात आला असून दुपारपर्यंत उर्वरित पंपही कोरडेठाक पडण्याच्या स्थितीत आहे. नाशिक शहरात सर्व कंपन्यांचे मिळून ११० पंप आहेत. तर ग्रामीण भागातील पंपांची संख्या ४५० च्या आसपास आहे. ज्या पंपांवर पेट्रोल, डिझेल शिल्लक आहे, तिथे लांबलचक रांगा लागल्या आहेत. अनेक पंपांवर रांगेतील वाहनधारकांनी रात्री पंप बंद करण्यास विरोध केला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात पंप बंद करण्याची वेळ आली. मंगळवारी अनेक ठिकाणी इंधन शिल्लक नसल्याचे फलक लागले. टंचाईची तीव्रता प्रकर्षाने जाणवत आहे.

पोलीस बंदोबस्तात टँकर भरण्याची तयारी

उद्भवलेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनी चर्चा केली. पेट्रोप पंप चालकांचे टँकर पोलीस बंदोबस्तात भरून देण्याबाबत जिल्हाधिकारी सकारात्मक आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी यंत्रणेला निर्देश दिले आहेत. वितरकांनी आपले टँकर उपलब्ध करून सहकार्य करावे आणि अत्यावश्यक सेवेसााठी काही इंधन राखीव ठेवावे. पंपावरील गर्दी हाताळण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या संपर्कात रहावे, असे आवाहन भोसले यांनी पेट्रोल पंपचालकांना केले.

नाशिक शहरात एका पंपावर दैनंदिन तीन ते साडेतीन हजार लिटर पेट्रोल तर सरासरी चार हजार लिटर डिझेलची विक्री होते. जिथे थोडाफार साठा शिल्लक आहे तिथे अनियंत्रित गर्दी आहे. निम्मे पंप कोरडेठाक झाले असून उर्वरित ठिकाणी दुपार, सायंकाळपर्यंत तीच स्थिती होणार आहे. शहर व ग्रामीण भागात एकूण ५५० च्या आसपास पेट्रोल पंप आहेत. शहरातील टंचाई पाहून अनेक वाहनधारकांनी ग्रामीण भागातील पंपांवर धाव घेतली. धास्तीमुळे वाहनधारक गरजेपेक्षा अधिक इंधन वाहनात भरतात. त्यामुळे शिल्लक साठाही लवकर संपुष्टात येत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत जो इंधन साठा दोन, तीन दिवसात विकला जाईल तो एकाच दिवसात विकला जात आहे. राज्यातील काही भागात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने इंधन वाहतूक सुरळीत होत आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पोलीस बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे. – विजय ठाकरे (राज्य उपाध्यक्ष, फामपेडा)