नाशिक : शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत असतांना पुण्याप्रमाणे कोयत्यांचा दहशतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. सातपूर येथील काठे हाऊस परिसरात सातपेक्षा अधिक गुंडांनी एकत्र येत कोयते घेऊन रहिवाशांना धमकावले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात चार विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी परिसरातून एका संशयिताला फिरविण्यात आले.

सातपूर परिसरातील काठे हाऊस या इमारतीत राहणाऱ्या एका युवकाला मारण्यासाठी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास त्याच परिसरातील पाच ते सात युवक एकत्र आले. हातात कोयते घेत ते इमारतीमध्ये शिरले. दुसऱ्या मजल्यावर जात असतांना त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या रहिवाशांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या. शिवीगाळ करण्यात आली.

हे ही वाचा…नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

रहिवाशांनी सातपूर पोलिसांशी संपर्क केल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन मुलांच्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी महेश सोनवणे (२१, रा. कामगार नगर) याला ताब्यात घेतले. अन्य चार विधीसंघर्षित बालक आहेत. लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी परिसरातून रविवारी सोनवणेला फिरविण्यात आले. रविवारी आमदार सीमा हिरे यांनी रहिवाशांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.