लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शहर परिसरातील १५ पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांसह त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या व्यक्ती, कार्यालये या ठिकाणी आयकर विभागाच्या वतीने छापे टाकण्यात आले. सहा दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाईत तीन हजार कोटीहून अधिक बेहिशेबी व्यवहार उघड झाल्याचे सांगण्यात येत असले तरी याविषयी आयकर विभागाच्या वतीने अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.
आयकर विभागाच्या वतीने २० एप्रिलपासून शहर परिसरात छापे टाकण्यास सुरुवात झाली. दिल्ली, मुंबई, पुणे येथील पथकासह अधिकारी, कर्मचारी असे २७५ हून अधिक जण या कारवाईत सामील होते. कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. शहराचा विकास वेगाने होत असतांना मोठ्या प्रमााणावर बांधकामेही होत आहेत. नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे शहरात भव्य प्रकल्प सुरु आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग, कॉलेज रोड, गंगापूर रोड, पंचवटी, आडगाव नाका अशा सर्वच ठिकाणी मोठे बांधकाम प्रकल्प सुरु आहेत.
हेही वाचा… नाशिक: बलात्कार प्रकरणी विद्यार्थी सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखास अटक
बांधकाम क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल होत असतांना बहुतांश बांधकाम व्यावसायिक करचुकवेगिरी करीत असल्याच्या संशयातून शहरातील १५ बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्याशी संबंधित वकील, वास्तुविशारद, व्यवस्थापक यासह अन्य ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. कारवाईत बांधकाम व्यावसायिकांककडील कागदपत्रांची छाननी, बँक खात्याचा तपशील, शहर तसेच जिल्हा परिसरात सुरू असलेले प्रकल्प यासह अन्य काही माहितींची पडताळणी करण्यात आली.
हेही वाचा… नाशिक: बीएड प्रवेशपूर्व परीक्षेत सावळागोंधळ, विद्यार्थ्यांना मनस्ताप
सहा दिवस ही कारवाई सुरू राहिली. या कारवाईत तीन हजार ३३३ कोटीहून अधिक बेहिशेबी व्यवहार उघड झाल्याचे सांगण्यात येत असून सात बड्या व्यावसायिकांचा यामध्ये समावेश आहे. साडेपाच हजार कोटीची रक्कम व दागिनेही जप्त करण्यात आल्याचे म्हटले जाते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या कारवाईसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही.