जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल शहरात जहांगीरपुरा भागात आईने मुलीसह घरात गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पतीशी घटस्फोट झाल्यानंतर सपना माळी (३३) या माहेरी एरंडोलच्या जहांगीरपुरा भागात महादेव मंदिरालगत मुलगी केतकी माळी (नऊ) हिच्यासह समारे आठ वर्षांपासून वास्तव्यास होत्या. एका खासगी शाळेची नोकरी सोडून वर्षभरापासून त्या घरीच होत्या. त्यांची मुलगी केतकी चौथीच्या वर्गात शिकत होती. गुरूवारी दुपारी घराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून त्यांनी मुलीसह गळफास घेतला. सपना यांचा भाऊ राहुल माळी घरी आल्यावर बहीण आणि भाची दिसून न आल्याने त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा ठोठावला.

मात्र, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. चुलतभाऊ मोहन महाजन यांना बोलावून सुताराच्या मदतीने दरवाजा तोडला. आतमध्ये प्रवेश केल्यावर खोलीतील दृश्य पाहून त्यांना हादरा बसला. त्यांना सपना आणि केतकी माळी या दोघींनी छताच्या कडीला वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी सापडलेल्या वहीत सपना माळी यांनी आपल्या आत्महत्येस नातेवाईक जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader