अवघ्या तीन महिन्याची ध्रुवांशी वडिलांकडे आणि तिच्या आजीकडे सतत राहते. त्यामुळे मुलगी वडिलांवर गेली असे सतत टोमणे मारले जात असल्याने आईनेच ध्रुवांशीची गळा चिरून हत्या केल्याचे उघड झाले आहे. ध्रुवांशीच्या आईने तशी कबुली पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी ध्रुवांशीची आई युक्ता रोकडे यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेणार आहेत.
हेही वाचा >>> नाशिक : तृणधान्य महोत्सवास जिल्हा परिषदेकडून अखेर मुहूर्त
सातपूर परिसरातील ध्रुव नगरात रोकडे कुटूंबिय राहतात. तीन महिन्याच्या ध्रुवांशीची गळा चिरुन हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर सातपूर परिसर हादरला होता. ध्रुवांशीच्या आईने सुरूवातीला पोलिसांकडे दिलेला जबाब संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्यावरच अधिक लक्ष ठेवले. युक्ता ही रसायनशास्त्राची पदवीधर आहे. ध्रुवांशी आईकडे न राहता तिच्या बाबांकडे तसेच आजीकडे अधिक जात होती. यावरून अन्य नातेवाईक टोमणे मारत असल्याचा युक्ताचा समज झाला. तिला त्यामुळे नैराश्यही येत होते. रविवारी सायंकाळी ध्रुवांशीची आजी दूध घेण्यासाठी बाहेर गेली. तेव्हा स्वयंपाकघरातील चाकूने ध्रुवांशीच्या गळ्यावर वार करुन युक्ताने तिचा खून केला. त्यानंतर चाकू धुवून जागेवर ठेवला. मात्र हा प्रकार झाल्यानंतर तिला घेरी येऊन ती कोसळली होती. युक्ताने दिलेला जबाब आणि नातेवाईकांचा जबाब यामध्ये तफावत आढळल्याने पोलिसांना युक्तावर संशय बळावला. युक्तासह सर्वच नातलगांची चौकशी झाल्यानंतर खरा प्रकार उघड झाला. या प्रकरणी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.