नाशिक – महाराष्ट्रातून गुजरातच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या खासगी प्रवासी बसशी संबंधितांकडून खासगी व्यक्तींच्या मदतीने ५०० रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित पेठ तपासणी नाक्यावरील मोटार वाहन निरीक्षक नितीन अहिरे यांच्यासह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील प्रादेशिक परिवहनच्या या तपासणी नाक्याविषयी वाहनधारकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. परंतु, तपासणी नाक्यावरील कारभारात कुठलाही बदल वा सुधारणा झालेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधकच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील पथकाच्या कारवाईतून या नाक्याची कार्यपद्धती उघड झाली. सहलीचे आयोजन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याने या नाक्यासंदर्भात तक्रार दिली. २० मार्च रोजी ते खासगी प्रवासी कंपनीच्या बसने छत्रपती संभाजीनगर येथून गुजरातमधील अंकलेश्वर येथे निघाले होते.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तपासणी नाक्यावर बस आली त्यावेळी मोटार वाहन निरीक्षक नितीन अहिरे हे कक्षात बसलेले होते. त्यांच्यासमोर विनोद साळवे (४७) या खासगी व्यक्तीने परराज्यात प्रवेश करण्यासाठी तडजोड रकमेच्या इ चलनासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ५०० रुपये त्याने स्वीकारले. मोटार वाहन निरीक्षक अहिरे यांनी साळवेला लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले.
लाचेची रक्कम स्वीकारत असताना मनोहर निकम (२७) या खासगी व्यक्तीने तक्रारदाराबरोबर असणाऱ्या पंचाला तपासणी नाक्याच्या कक्षात प्रवेश करण्यापासून अटकाव करुन गुन्ह्यास सहाय्य केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.