नाशिक -सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात बुधवारी दुचाकी आणि शालेय बस यांच्यात झालेल्या अपघातात १८ वर्षाच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.सकाळी ११ वाजेच्या सुमारास मयूर गुंजाळ (१८, महाले फार्म, राणाप्रताप चौक ) हा दुचाकीने दिव्या ॲडलॅब्जकडून त्रिमूर्ती चौक रस्त्याकडे जात होता. यावेळी दुचाकी आणि खासगी शाळेची बस यांचा अपघात झाला. गंभीर जखमी मयूर यास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचा मृत्यू झाला.
अंबड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिमूर्ती चौक, पवन नगर अशा सिडकोतील भागात मोठ्या प्रमाणावर गजबज वाढली असून त्यातच रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांचे अतिक्रमण होत असल्याने वाहनधारकांसाठी अरुंद रस्ता मिळतो. अपघातांमागील हेही एक कारण आहे. मयूर याचा अपघात ज्या ठिकाणी झाला, त्या परिसरात नेहमीच अपघात होत असतात. परिसरात अपघात प्रवणक्षेत्र असा फलक लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.