नाशिक – समृध्दी महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहनधारकांना काहीअंशी अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवासाला खड्डे, वाहतूक कोंडी आणि उड्डाण पुलाच्या कामांमुळे आठ ते १० तास लागत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली होती.

हेही वाचा >>> अंबड प्रकल्पग्रस्त आंदोलनावर ठाम, लोणीपर्यंत अर्धनग्न मोर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांची दीड तास मंत्रालयात बैठक घेऊन महामार्ग सुस्थितीत करण्याचे निर्देश दिले होते. सध्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या स्थितीत ४० टक्के सुधारणा झाली असून आणखी सुधारणा होणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले. उड्डाणपूल व तत्सम कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक वळवली गेली आहे. वाहतूक वळविलेला सेवा रस्ता पुढे महामार्गाला जोडला जातो. अशा ठिकाणी दोन्ही रस्त्यांत उंचीचा फरक आहे. त्यामुळे अवजड, मोठ्या वाहनांना संथपणे मार्गक्रमण करावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाने (सार्वजनिक उपक्रम) महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी १७५ ट्रॅफिक वॉर्डन दिले होते. मध्यंतरीच्या काळात न दिसणारे हे वॉर्डन वाहतूक पोलिसांसमवेत ठिकठिकाणी दिसत आहेत. काही ठिकाणी रस्ता खराब आहे. भुयारी मार्गातून जावे लागते. प्रगतीपथावरील पूल, तत्सम कामात पावसामुळे मर्यादा येते. पाऊस उघडल्यानंतर ही कामे करता येतील, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.