नाशिक – जिल्ह्यातील ग्रामीण युवकांचे मानसिक आरोग्य सशक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद आणि इनफिहील हेल्थटेक प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारातंर्गत जिल्ह्यातील ५००० ग्रामीण युवकांना “हिलो” या एआय आधारित ॲपच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी भौतिकोपचार तज्ज्ञ आणि सहकाऱ्याच्या मदतीने सेवा मिळणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांचे भावनिक सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, आत्महत्या प्रतिबंधात्मक मदत तसेच मानसिक आरोग्याच्या तातडीच्या समस्यांवर वेळीच उपाययोजना केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आणि इनफिहील हेल्थटेक प्रा. लि.च्या संचालक सृष्टी श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीने कौशल्य, रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने भोळे मंगल कार्यालय येथील युवा रोजगार मेळाव्यात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, सामाजिक कार्यकर्त्या रश्मी बेंडाळे-हिरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल उपस्थित होते.

ग्रामीण भागातील काही युवक-युवती तणाव, नैराश्य, आत्महत्येचे विचार अशा मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत असतात. शहरांमध्ये मानसिक आरोग्यासाठी विविध सुविधा सहज उपलब्ध असतात. ग्रामीण भागातील युवकांना वेळेवर आणि विश्वासार्ह मदत मिळणे कठीण होते. ही समस्या ओळखून संबंधित करार करण्यात आला आहे.

“हिलो” या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याशी संबंधित सेवा ग्रामीण युवकांना सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये या सेवेचा विस्तार करण्यात येणार असून सुरुवातीच्या टप्प्यात ५००० युवकांना थेट या सुविधेचा लाभ मिळेल. यांतर्गत युवकांना मानसिक आरोग्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, तणाव व्यवस्थापन, समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि समूपदेशन अशा सेवा दिल्या जाणार आहेत. ही सेवा पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाणार आहे, जेणेकरून युवक स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी खुलेपणाने मदत घेऊ शकतील. ग्रामीण भागातील युवकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने हे महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.

जिल्हा परिषद आणि इनफिहील हेल्थटेक प्रा. लि. यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत जिल्ह्यातील ५००० ग्रामीण युवकांना “हिलो” या एआय आधारित ॲपच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी भौतिकोपचार तज्ज्ञ आणि सहकाऱ्याच्या मदतीने सेवा मिळणार आहेत. युवकांना मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन, तणाव व्यवस्थापन, समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि समूपदेशन अशा सेवा मिळतील.