शहरातील भूईकोट किल्ल्याभोवती झालेली अतिक्रमणे हटवून या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यात यावे, या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या संदर्भात महसूल, महापालिका व पोलीस प्रशासनाने भूईकोट किल्ला बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>>नाशिक : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीला आग, मोठ्या प्रमाणात नुकसान
भूईकोट किल्ल्याभोवती झालेली अतिक्रमणे हटविण्यात यावीत ही जुनी मागणी आहे. सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे करण्यात आलेल्या याचिकेत लोकायुक्तांनीदेखील ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अतिक्रमणे हटविण्याच्या संदर्भात महापालिका प्रशासन उदासिनता दाखवत असल्याची शहरवासियांची तक्रार आहे. या मागणीसाठी किल्ला बचाव समितीतर्फे प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्याची ग्वाही अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी दिली. तसेच दरम्यानच्या काळात अतिक्रमण निर्मूलन व अतिक्रमितांचे पुनर्वसन करण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव महापालिकेकडून प्राप्त केला जाईल,असेही पाटोळे यांनी स्पष्ट केले. त्यावर सकारात्मकता दर्शवून २६ जानेवारी रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्याचे समितीने मान्य केले.
हेही वाचा >>>नाशिक जिल्ह्यात पाच घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास
मात्र यासंदर्भात शहरात जनजागृती फेरी काढण्यावर समिती ठाम असल्याचे समितीने कळविण्यात आले आहे. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती,उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा,पोलीस उपअधीक्षक विजय जाधव,महापालिकेचे नगररचनाकार संजय जाधव, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर आदी अधिकारी तसेच भूईकोट किल्ला बचाव समितीच्या वतीने रामदास बोरसे, निखिल पवार,देवा पाटील,भरत पाटील,कैलास शर्मा,गोपाळ सोनवणे,सुशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.