काम रखडले, तक्रारदार माघारी

पाणीप्रश्नावरून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा फटका या कार्यालयातील सर्वसामान्यांचे काम रखडण्यात झाला. लोकशाही दिनाच्या कामासही त्याचा फटका बसल्याने तक्रारदारांना माघारी परतावे लागले.

जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनामुळे कार्यालयीन कामे रखडली. शासनाच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवरील महसूल, कृषी, आरोग्य, महापालिका यासह विविध आस्थापनांशी संबधित तक्रारींचा निपटारा जिल्हा पातळीवर व्हावा यासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. या उपक्रमात संबंधित विभागाचे प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातात. मात्र, या दिवशी आंदोलनामुळे सर्वसामान्यांना आपल्या तक्रारी मांडण्याची संधी मिळाली नाही. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिल्याने दुपारी दोनला सुरू होणारा लोकशाही दिन रेंगाळला. चापर्यंत तो सुरू होऊ शकला नाही. या कालावधीत निम्माहून अधिक विभाग प्रमुख, त्यांचे प्रतिनिधी तसेच नागरिक आल्या पावली परत गेले. दरम्यानच्या काळात प्रशासनाने तो स्थगित करण्याऐवजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली उशिराने सुरू केला. मात्र अवघ्या काही मिनिटांच चर्चा करत तो आटोपता घेण्यात आला. तत्पूर्वीच, अनेक तक्रारदार निघून गेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर विभागांच्या कामकाजावर आंदोलनाचा विपरीत परिणाम झाला. मोठा बंदोबस्त पाहून कामकाजानिमित्त आलेले नागरिक माघारी परतले.

Story img Loader