लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजनेतून चार दिवसाआड पाणी देण्याची लेखी हमी मिळाल्यानंतर परिसरातील गावकऱ्यांनी सुरु केलेले धरणे आंदोलन स्थगित केले आहे.

दहिवाळसह २६ गाव योजनेतील गावांना ऐन पावसाळ्यात टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत पुरवठ्यातून इंद्रतारा ऑईल मिलला देण्यात आलेल्या जोडणीमुळे वीज पुरवठ्यात व्यत्यय येत आहे, त्याचमुळे पाणी टंचाईची समस्या उद्भवल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. हा पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी गावकऱ्यांनी दहिवाळ येथून मोर्चा काढला. तसेच इंद्रतारा ऑईल मिलसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

आणखी वाचा-नाशिक: सटाण्यातील घरफोडीत नऊ लाखाचा ऐवज, वाहनही लंपास

वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मिलला बेकायदेशीररित्या वीज जोडणी दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जोपर्यंत दोन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिले. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. तेव्हा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी मगर यांनी वीज वितरण कंपनी आणि जल प्राधिकरणचे अधिकारी तसेच आंदोलनकर्त्यांमध्ये मध्यस्थी करत मार्ग काढला. त्यानुसार पंधरा दिवसात गिरणा धरणावरील पाणी उपसा सुरळीत होण्यासाठी व्यवस्था करण्याचे लेखी आश्वासन वीज वितरण कंपनीने दिले. तर येत्या आठ दिवसाच्या आत संपूर्ण २६ गाव योजनेतील गावांना चार दिवसाआड पाणीपुरवठा देण्याचे जलप्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले.

आणखी वाचा-महावितरणच्या कारभारावर उद्योजकांचा रोष, संवाद कार्यक्रमात तक्रारींचा भडिमार

यावेळी जलजीवन प्राधिकरणचे विभागीय अभियंता अनिल पगार, उपअभियंता किरण दाभाडे, शाखा अभियंता डी. आर. अलगट, सचिन पगार, वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल नागरे, उपअभियंता पंकज वानखेडे आदी उपस्थित होते. आंदोलनात आर. डी. निकम, शेखर पगार, चंद्रकांत वाघ, शेरूळचे सरपंच राकेश महाले, साजवहाळचे सरपंच धर्मा पाटील, भास्कर गोसावी, बळीराम वाघ, शांताराम पवार आदी सामील झाले होते.