नाशिक – वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व यांचा काय संबंध, असा प्रश्न करुन खासदार संजय राऊत यांनी हिंदुत्वाचे नाव द्यायचे आणि जमिनी बळकावयाच्या, हे भाजपचे धोरण असल्याची टीका केली. दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असतांना रविवारी खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वक्फ मंडळाच्या जागांवर उद्योगपतींची आलिशान घरे उभी असून ती कायदेशीर करण्यासाठी पाऊल उचलले गेले. मागील दहा वर्षात देशातील संपत्ती, सार्वजनिक संपत्ती विकून झाली. काही उरले नाही म्हणून वक्फ मंडळाच्या जमिनींमागे लागले आहेत. भविष्यात मुस्लिमांची सर्व संपत्ती भाजपशी संबंधित उद्योगपतींच्या घशात जाणार असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
आजचा भारतीय जनता पक्ष खरा नाही. लालकृष्ण अडवाणी, पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी यांचा पक्ष गेला. आता हा पक्ष दुसऱ्या लोकांनी पळवला आहे, अशी टीका राऊत यांनी केली. दरम्यान, राऊत यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हे मंदिर सामाजिक चळवळीशी संबंधित असून या ठिकाणी रामनवमीला शासकीय पूजा व्हावी, अशी मागणी आहे. देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का आले नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.