नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेवेळी एका केंद्रावर २८ वर्षांच्या परीक्षार्थीला अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यातच रक्तस्त्रावही होऊ लागला. अशावेळी पोलिसांनी तत्परता दाखवित संबंधित महिलेस रुग्णालयात दाखल केले. महिलेची सुखरुप प्रसुती होऊन मुलगी झाली.या सर्व धावपळीत पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे भारावलेल्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी मालेगावहून युगंधरा गायकवाड (२८) या सकाळी नाशिक येथील व्ही.एन.नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दाखल झाल्या. परीक्षा १० वाजता सुरू झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटात युगंधरा यांना त्रास सुरू झाला. परीक्षा सुरू असतानाच रक्तस्त्रावामुळे त्यांचे कपडे भिजले. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांना केंद्राबाहेर आणले. केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेले हवालदार जयंत जाधव आणि रोशनी भामरे यांनी तत्काळ युगंधरा यांना शासकीय वाहनातून पंडित कॉलनी येथील रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्रावामुळे त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना वेद मंदिरामागील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. हवालदार जाधव यांनी संबंधित रुग्णालयाशी संपर्क करुन त्यांना आधीच महिलेच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्यानंतर युगंधरा यांना त्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, युगंधराच्या नातेवाईकांशी संपर्क करुन त्यांनाही रुग्णालयात बोलविण्यात आले. युगंधराची तातडीने प्रसुती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा…नाशिकरोड चोरीतील मुद्देमाल हस्तगत

दरम्यान, याचवेळी युगंधराचे पती गोरख हेही दुसऱ्या केंद्रात परीक्षा देत होते. त्यांना पोलिसांनी माहिती दिल्यानंतर दुपारी बारानंतर गोरख हे रुग्णालयात आले. युगंधरा यांच्या प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना मुलगी झाली. बाळाची तब्येत नाजूक असल्याने दुसऱ्या रुग्णालयात अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. बाळ तसेच युगंधरा दोघींची प्रकृती स्थिर आहे. युगंधराच्या नातेवाईकांना सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc during exam 28 year old woman experienced labor pain and bleeding but police assisted her sud 02