सौंदर्य, परंपरेचा साज आणि सामाजिक भान याचा मिलाफ असलेली ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाइड’ स्पर्धेत सौंदर्यवती, शिक्षणतज्ज्ञ नमिता परितोष कोहोक यांनी आपली विजयी मोहोर उमटवत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोहोक यांना याआधी मिसेस इंडिया फोटोजनिक किताब मिळाला आहे.
हाँगकाँग येथे ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाइड’ स्पर्धा पार पडली. स्पर्धेत जगभरातील २७ नामांकित देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेची विभागीय फेरी मुंबई येथे पार पडली. त्यात देशातील विविध राज्यांतील १२ सौंदर्यवतींची निवड करण्यात आली होती. यामध्ये नाशिकच्या नमिता यांचा समावेश होता.
स्पर्धा तीन फेरीत झाली. पहिल्या फेरीत स्वतची ओळख ज्यामध्ये देहबोली, आत्मविश्वास आदींचा विचार झाला. दुसऱ्या फेरीत परंपरा आणि संस्कृती यावर आधारित पेहराव करत ‘रॅम्पवॉक’ करण्यात आला. आपण जो पेहराव करू त्यावर स्पर्धकाला १० मिनिटे बोलावे लागले. अंतिम फेरीत परीक्षकांकडून प्रश्नही विचारण्यात आले. स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत पारंपरिक पोशाखासाठी नमिता यांनी काळ्या रंगातील ‘चंद्रकला’ पैठणीला पसंती देत त्याला साजेसे दागिने निवडले. अंतिम फेरीत प्रथमच आंतरराष्ट्रीय रॅम्पवर नाशिकची पैठणी दिमाखात सर्वासमोर आली आणि परीक्षकांच्या पसंतीला उतरली. चंद्रकलेवर असणारा बांगडी मोर, त्यावरील इरकली नक्षीकाम याविषयी स्पर्धेत माहिती देऊन त्यांनी सर्वाची मने जिंकली. स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे स्पर्धा सामाजिक आरोग्य या विषयांशी संबंधित असून पहिल्यांदाच तिचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाची स्वतची एक कहाणी होती. स्वत नमिता गेल्या काही वर्षांपासून कर्करोगांशी लढा देत आहे. आपल्या आजाराचे भांडवल न करता त्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धेत पाऊल ठेवले आणि विजेतेपद पटकावले. ‘ग्लोरी ऑफ ट्रॅडिशन’मध्ये पैठणीसाठी त्यांना ‘बेस्ट ट्रॅडिशनल आऊटफिट’ किताब मिळाला आहे. त्यांच्यासह मिसेस बोरनिओ, मिसेस मॅकेडोनिया उपविजेत्या ठरल्या.

Story img Loader