आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीज पुरवठय़ाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने ‘टोल फ्री’ क्रमांक आणि पाठोपाठ ग्राहकांना विविध सेवा देण्यासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ही विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे कोणत्याही वेळी वीज देयकांचे अवलोकन, वीजभरणा, तक्रार नोंदणी आणि नंतर तक्रारीची सद्यस्थिती आदींची माहिती घेता येईल.

वीजसेवेशी संबंधित स्थानिक पातळीवर तक्रार स्वीकारणारी तक्रार निवारण केंद्रे फेब्रुवारी महिन्यात बंद केली होती. त्यास पर्याय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १८००२३३३४३५ किंवा १८००२००३४३५ या क्रमांकावर हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले गेले. या क्रमांकावर राज्यातील ग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या भ्रमणध्वनी अथवा दुरध्वनीवरून तक्रार नोंदविता येते. तक्रार नोंदविताना ग्राहकास आपला ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे.

या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही वेळी तक्रार नोंदविता येते. या ठिकाणी आलेल्या तक्रारी केंद्रामार्फत संबंधित कार्यालयास वर्ग करून सोडविल्या जातात. या जोडीला महावितरण मोबाइल अ‍ॅपही उपलब्ध झाले आहे. ग्राहकांना भ्रमणध्वनीवरून ऑनलाइन वीज देयक पाहता येईल.

देयक भरणा, तक्रार नोंदणी, तक्रारीची सद्यस्थिती पाहण्याबरोबर ऑनलाइन देयकही भरता येईल. त्यांच्या पावत्याही लगेच मिळू शकतील. महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर हे अ‍ॅप उपलब्ध असून ते भ्रमणध्वनीत कसे ‘डाऊनलोड’ करावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

गुगल प्ले स्टोअरमधून महावितरण अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. त्यावर ग्राहक क्रमांक दिल्यावर इंग्रजी अथवा मराठी हव्या त्या भाषेत माहिती उपलब्ध करून घेता येईल. आतापर्यंत राज्यातील एक लाख नागरिक या सुविधेचा वापर करत असून इतर ग्राहकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl app to help customers