इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून मराठवाडय़ाकरिता सोडण्यात येणारे पाणी हे तालुक्यातील शेतकरी आणि जनतेला टंचाईच्या गर्तेत लोटण्याचा शासनाचा डाव असून तो उधळण्याचा इशारा देत मनसेनेही पाण्यावरून पेटलेल्या राजकारणात उडी घेतली आहे.
पाणी सोडण्यात येणाऱ्या कालव्यात राजसैनिक ठिय्या मांडतील, असा इशारा मनसेचे उपजिल्हाप्रमुख रतनकुमार इचम यांनी दिला. दारणाच्या पाणीप्रश्नाबाबत मनसेची भूमिका व आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी इगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तातडीची बैठक घोटी येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयात झाली.
यावेळी अ‍ॅड. इचम यांनी शासनाने २०१२ मध्ये तालुक्यात जनतेला विश्वासात न घेता दारणा धरणातून पाणी सोडले होते. तेव्हादेखील मनसेने तालुक्याच्या हितासाठी व्यापक जनआंदोलन उभारले होते. शेतकऱ्याच्या हितासाठी लढा उभारून तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून दिला होता. मात्र शासन यावर्षी दिवाळीपूर्वी दारणा धरणातील निम्मा साठा मराठवाडय़ाला सोडणार असल्याने तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे कृत्रिम संकट ओढावणार आहे. तालुक्याला प्रथम दुष्काळी जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. दारणा धरणातून टंचाईच्या नावाखाली पाण्याचा होणारा मोठा विसर्ग रोखण्यासाठी आणि त्याला स्थगिती मिळविण्यासाठी इगतपुरी तालुका मनसे न्यायालयात जाणार असून जनहित याचिका दाखल करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा